राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे ‘बाळासाहेब ठाकरे जीवनदायी योजना’ असे नामकरण करण्याचे प्रस्तावित आहे; परंतु एखाद्या योजनेचे आकसाने नाव बदलणे हा चुकीचा पायंडा ठरेल, अशी प्रतिक्रिया महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी व्यक्त केल्यामुळे नामांतराच्या आधीच युती सरकारमध्ये वादाचे धुमारे फुटण्याची चिन्हे आहेत.

काँग्रेस आघाडी सरकारने पाच वर्षांपूर्वी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सुरू केली. आता या योजनेचे नाव बदलण्याचे घाटत आहे. शिवसेनेकडे आरोग्य मंत्रिपद आहे. या खात्याचे मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी या योजनेला दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. या संबंधात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही पत्रव्यवहार केला आहे. मुख्यमंत्री त्यासाठी अनुकूल असून लवकरच हा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर मान्यतेसाठी मांडला जाईल, असे सावंत यांनी जाहीर केले आहे. मंत्रालयात सोमवारी महसूलमंत्री खडसे यांना जीवनदायी योजनेच्या नामांतराविषयी विचारले असता, त्यांनी त्याबद्दल नापसंती व्यक्त केली. ज्या व्यक्तीचे काही योगदान असते, अशा व्यक्तींचे नाव एखाद्या योजनेला दिले जाते. यापूर्वी राज्यात युतीचे सरकार होते, त्या वेळी आधीच्या सरकारच्या योजनांची नावे बदलली नव्हती. संजय गांधी निराधार योजना तेव्हाही होती आणि आताही आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव नव्या योजनेला द्यावे, परंतु आकसाने जुन्या योजनेचे नाव बदलणे, असा चुकीचा पायंडा पडेल, असे ते म्हणाले.