राज्यात शिवसेना आणि राणा दाम्पत्यामध्ये राजकीय कलगीतुरा रंगून राजकीय वातावरणाचा पारा चांगलाच चढला. असं असताना शिवसेना खासदार संजय राऊत आणि खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांचे लडाखमधील एकमेकांसोबत चर्चा करतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. त्यावर महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापवणारे स्वतऋ लडाखमध्ये सैर करत असल्याची टीका होतेय. याविषयी पत्रकारांनी विचारणा केली असता मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिलीय. त्या शनिवारी (२१ मे) मुंबईत बोलत होत्या.

किशोरी पेडणेकर म्हणाल्या, “संजय राऊत आणि नवनीत राणा हे दोघे खासदार आहेत. ते अभ्यास गट म्हणून पाहणी करायला गेले होते. खासदार म्हणून पाहणी करणं हे वातावरण पूर्णपणे वेगळं आहे. आपण व्यक्तीशः प्रचंड राग करतच नाही. त्यांच्या कृतीचा प्रचंड राग आहे. संजय राऊत यांचं वर्तन मुळात संपादक म्हणून असतं. त्यामुळे लडाख आणि महाराष्ट्रातील वागणं याचा संबंध लावणं गैर आहे.”

“पालिका इतरांवर कारवाई करते, तशी राणांवरही कारवाई करेल”

राणा दाम्पत्याच्या घरावरून मुंबईत पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध राणा असा संघर्ष पहायला मिळणार का या प्रश्नावर पेडणेकर म्हणाल्या, “मुळात या प्रकरणात शिवसेनेचा काही प्रश्नच राहिला नाही. आता केवळ पोलीस आणि महापालिका यांचा प्रश्न आहे. महापालिका त्यांच्यावर कारवाई करेल. पालिका इतरांवर कारवाई करते, तर यांच्यावरही करेल. त्यामुळे आता महापालिका आणि राणा असा संघर्ष दिसेल.”

हेही वाचा : “राणा दाम्पत्याला ‘सी ग्रेड पब्लिसिटी’ लागते, त्यासाठी…”, किशोरी पेडणेकरांचा गंभीर आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“राणांना ती नोटीस शिवसेनेने नेऊन दिलेली नाही”

“राणा दाम्पत्य त्यांच्या घराचं बांधकाम बेकायदेशीर नाही म्हणत आहे तर त्यांनी ते महापालिकेला सिद्ध करून द्यावं. शेवटी पालिकेत राज्य शिवसेनेचं असलं तरी ती नोटीस शिवसेनेने नेऊन दिलेली नाही. त्यांनी महापालिकेला त्याबाबत पुरावे द्यावेत,” असंही किशोरी पेडणेकर यांनी नमूद केलं.