मुंबई : जी. ए. कुलकर्णी आणि सुनीता देशपांडे या दोन नामवंतांच्या पत्रसंवादाचे अभिवाचन लेखिका माधुरी पुरंदरे आणि अभिनेते गिरीश कुलकर्णी यांनी स्वतःच्या प्रतिभेचे रंग भरून केलेले बहारदार सादरीकरण याने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. विनोदी लेखानावरील प्रसिद्ध विनोदी लेखक सॅबी परेरा आणि मंदार भारदे यांचा रंगलेला, परखड मते मांडणारा हास्यसंवाद, मानसिक तणाव व्यवस्थापनावरील मार्गदर्शन आणि पारलिंंगींनी आपल्या जगण्याचे उलगडलेले पदर अशा विविधांगी कार्यक्रमांच्या सादरीकरणाचा आस्वाद मंगळवारी ठाणेकर रसिकांना घेता आला.
यंदा प्रथमच साजरा होणारा ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’चा उत्सव मंगळवारी ठाण्यातील काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे साजरा झाला. कलांचा हा उत्सव इथून पुढे पार्ल्यातील लोकमान्य सेवा संघ, ठाण्याचे गडकरी रंगायतन येथे रंगणार आहे. यानिमित्ताने विविध ठिकाणी दररोज विविध कार्यक्रमांची मेजवानी रसिकांना अनुभवता येत आहे. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’च्या मंचावर पहिल्या सत्रात यश वेलणकर यांनी मानसिक तणाव व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले.
तर, दुसऱ्या सत्रात प्रसिद्ध विनोदी लेखक मंदार भारदे आणि सॅबी परेरा यांनी ‘आजच्या काळातील विनोदी लेखन’ या विषयावर अभ्यासपूर्ण टिप्पणी करतानाच त्यातील आव्हानांवरही चर्चा केली. तिसऱ्या सत्रात पारलिंगींची अभिव्यक्ती या चर्चासत्रात नक्षत्र बागवे, प्रिशा, जामिना बाविस्कर आणि अरुणा देसाई सहभागी झाले होते, तर चौथ्या सत्रात प्रसिद्ध लेखिका माधुरी पुरंदरे आणि अभिनेते गिरीश कुलकर्णी यांनी बहारदार पत्रवाचनाचे अभिवाचन करून जी. ए. कुलकर्णी आणि सुनीता देशपांडे यांचे प्रतिभावंत मैत्र रसिकांपर्यंत पोहोचवले. यामुळे दिवसभर रसिकांना साहित्यिक आणि वैचारिक कार्यक्रमांची पर्वणी अनुभवता आली.
‘रुंग्ली रुंग्लीयॉट’
पु. ल. देशपांडे कलकत्त्यात शांती निकेतनमध्ये असल्याने त्यांना जी. ए. कुलकर्णी यांनी लिहिलेले पत्र सुनीताबाईंच्या हातात पडते. पुलंच्या वतीने आत्मीयतेने त्या पत्राला सुनीताबाईंनी दिलेले उत्तर आणि त्यातून दोन भिन्न टोकदार व्यक्तींचा, विचारवंतांचा एकमेकांशी सुरू झालेला पत्ररूपी संवाद हा त्या दोघांच्या अंतरंगात सहज शिरून व्यक्ती ते समष्टीपर्यंतचा प्रवास आपल्याला घडतो तो ‘रुंग्ली रुंग्लीयॉट’च्या माध्यमातून… एकमेकांच्या बौद्धिक, सामाजिक प्रतिभेचा, अस्तित्वाचा अदमास घेत सुरू झालेला हा संवाद ये हृदयीचे ते हृदयीपर्यंत कसा पोहोचतो याची अलवार आणि तितकाच अर्थगर्भ अनुभूती देणारा ‘रुंग्ली रुंग्लीयॉट’ हा प्रयोग ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’च्या मंचावर रंगला.
मराठी सारस्वतांमधील अग्रणी जी. ए. कुलकर्णी आणि विदुषी सुनीताबाई देशपांडे यांच्यातील पत्रसंवाद म्हणजे मौलिक खजिना. या दोन भिन्न प्रकृतीच्या, विचारांच्या आणि तरीही दृढ मैत्रीच्या नात्याने एकमेकांशी जोडल्या गेलेल्या साहित्यिकांचा पत्रसंवाद रंगवणारा ‘रुंग्ली रुंग्लीयॉट’ हा सुंदर प्रयोग ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’ अंतर्गत ठाणे येथील काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात रंगला.
मराठी-हिंदी चित्रपटातून गाजलेले अभिनेते, लेखक, निर्माते गिरीश कुलकर्णी आणि ख्यातनाम लेखिका माधुरी पुरंदरे यांनी या पत्रांचे अभिवाचन केले. प्रसिध्द लेखक, दिग्दर्शक उमेश विनायक कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून ‘रुंग्ली रुंग्लीयॉट’ हा कार्यक्रम साकारला आहे. जी. ए, कुलकर्णी आणि सुनीताबाई देशपांडे या दोन प्रतिभावंतांमध्ये पत्रांच्या माध्यमातून मैत्रीची घट्ट वीण बांधली गेली. एखाद्या व्यक्तीशी सूर जुळला की हळूहळू आपल्याला आवडलेली एखादी कविता, एखादे पुस्तक, एखादा साहित्यिक यांच्याविषयी बोलणे सुरू होते. समोरची व्यक्ती आपल्या विचारातून त्या संदर्भात व्यक्त होते. त्यातून एकमेकांच्या आवडीनिवडीची जाणीव होते. मग हळूहळू विचारांची दिशा लक्षात आली तरी त्यातले बरे वाईट, योग्य अयोग्य अशी साधकबाधक चर्चा होते. हा सगळा प्रवास जी ए आणि सुनीताबाईंच्या मैत्रीतही कसा घडत गेला आणि त्या दोघांमधला हा जिव्हाळ्याचा संवाद समाजासाठीही अनमोल ठेवा कसा ठरला याचा अनुभव ‘रुंग्ली रुंग्लीयॉट’ या प्रयोगातून येतो.
दिग्दर्शक उमेश विनायक कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून उतरलेल्या ‘रुंग्ली रुंग्लीयॉट’चे संगीत मंगेश धाकडे यांचे आहे. कार्यक्रमाची दृश्यरचना सत्यजीत पटवर्धन यांनी केली असून कला दिग्दर्शन दीप साखरे यांचे आहे. निर्मिती प्रमुख म्हणून अपूर्व ठाकर यांनी जबाबदारी सांभाळली आहे.
