मुंबई : राज्यात अचानक कोसळणारा पाऊस, लांबणारा मान्सून, मराठवाड्यासारख्या ठिकाणी झालेली अतिवृष्टी असे वातावरणीय बदल आपल्याला यंदा प्रामुख्याने जाणवले. मराठवाड्यात सामान्य पर्जन्यमानाच्या १३९.७ टक्के पाऊस झाला. वाढत्या हवामान बदलांचे अनुमान लावणेही कठीण झाले आहे.
२०५० सालापर्यंत देशात उष्माघाताचे प्रमाणही वाढणार असून वार्षिक सात ते आठ दिवसांची यात वाढ होणार आहे. या एकंदर हवामान बदलाला रोखायचे असेल तर तरुण पिढीमध्ये याविषयी अधिकाधिक जनजागृती करून त्यांच्यात वनसंपदा, तिवरांचे महत्त्व, तसेच पर्यावरणाचे संतुलन याविषयी स्वारस्य निर्माण करणे आवश्यक असल्याचे मत पर्यावरण विषयावरील प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो आणि युनिसेफच्या वतीने आयोजित परिसंवादात व्यक्त करण्यात आले.
पत्र सूचना कार्यालय (पीआयबी) आणि युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने वातावरणीय बदल आणि पर्यावरणविषयक जनजागृती या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या परिसंवादात सामूहिक हवामान बदल प्रयत्न, युवकांचा सहभाग आणि शाश्वत जल-ऊर्जा प्रारूपांचा महाराष्ट्रात वापर करण्यावर भर देण्यात आला. यावेळी पर्यावरणीय साक्षरता आणि जनजागृतीत प्रसारमाध्यमांची महत्त्वाची भूमिका असल्याची बाब पत्र सूचना कार्यालयाच्या (पश्चिम विभाग) महासंचालक स्मिता वत्स शर्मा यांनी अधोरेखित केली. यावेळी युनिसेफचे पर्यारवण अभ्यासक युसूफ कबीर यांनी महाराष्ट्रातील पर्यावरण बदलांवर भाष्य केले.
भारत हा तरुणांचा देश असून २९ टक्के लोकसंख्या ही १५ वर्षांपेक्षा कमी वयाची आहे. २७ टक्के लोकसंख्या १५-२९ वय, तर ५६ टक्के लोकसंख्या ही ३० वर्षांखालील आहे. या तरुणांना निरोगी वातारवणात जगण्याचा हक्क असल्याचे ते म्हणाले. अशावेळी प्रदूषण, बदलते पर्यावरण, नैसर्गिक संसाधने आणि जैवविविधता जपण्याचे मोठे आव्हान असल्याचे ते म्हणाले.
अधिकाधिक तरुणांच्या सहभागानेच हे शक्य असल्याचे त्यांनी नमूद केले. मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीबाबत चिंता व्यक्त करताना ते म्हणाले की, दुष्काळी भाग हा अवर्षणग्रस्त होत आहे. त्यामुळे मोठे आव्हान उभे असून त्यावर आतापासूनच उपाययोजना करणे आवश्यक आहे.
यावेळी राज्य हवामान कृती कक्षाचे संचालक डॉ. अभिजित घोरपडे यांनी अक्षय ऊर्जेच्या माध्यामातून पर्यावरण समतोलावर भाष्य केले. राज्याचे ईलेक्ट्रिक वाहन धोरण, बांबू लागवड, देवराईंचे संरक्षण आणि निर्मिती, तसेच सौरऊर्जा निर्मितीसंदर्भात राज्यात सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.
त्याचप्रमाणे माझी वसुंधरा अभियानाचे मिशन संचालक सुधाकर बोबडे यांनी या अभियानातील तरुणांच्या सहभागाबाबत माहिती देताना या अभियानाच्या माध्यमातून पर्यारवरण संवर्धनासाठी सरकारकडून दिल्या जाणाऱ्या प्रोत्साहनपर उपक्रमांचीही माहिती दिली.
माझी वसुंधरा अभियानाने २७ हजारांहून अधिक गावे, ४०० शहरी स्थानिक संस्था आणि ५०० महाविद्यालयांना ऊर्जा, जल, शुद्ध हवा, कचरा आणि जैवविविधता या घटकांचा समावेश असलेला पाच-कलमी कार्यक्रमात सहभागी करून घेतल्याचे त्यांनी सांगितले. पीआयबी मुंबईचे संचालक सय्यद रबीहश्मी यांनी या सत्राचा समारोप केला. तर उपसंचालक जयदेवी पुजारी स्वामी यांनी आभार प्रदर्शन केले. परिसंवादाचे सूत्रसंचालन सोनल तुपे यांनी केले.