मुंबई : नरहर कुरुंदकर यांच्या नांदेड येथील स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्याच्या उभारणीसाठी राज्य सरकारने समितीची स्थापना केली आहे. नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दुसऱ्या टप्प्यातील बांधकामासाठी १४.७८ कोटी रुपयांच्या कामांचा प्रस्ताव दिला आहे. समिती या बाबत निर्णय घेणार आहे.
राज्य सरकारने मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री अतुल सावे समितीचे उपाध्यक्ष असणार आहेत. विधान परिषद सदस्य हेमंत पाटील, विधान सभेच्या आमदार श्रीजया चव्हाण, बालाजी कल्याणकर, राजेश पवार यांच्यासह डॉ. रविंद्र तांबोळी, इतिहासतज्ज्ञ बालाजी चिरडे, वास्तुशास्त्रज्ञ अजय कुलकर्णी, समाजसेवक डॉ. सुरेश खुरसाळे, नरहर कुरुंदर प्रतिष्ठानच्या अध्यक्ष श्यामल कुरुंदकर आणि विश्वस्त दीपनाथ पत्की समितीचे सदस्य आहेत.
दुसऱ्या टप्प्यातील बांधकाम अंदाजपत्रकानुसार होत आहे का. बांधकाम गुणवत्तापूर्ण आणि नियोजित वेळेत पूर्ण करणे. प्रशासकीय मान्यता दिलेल्या बाबीवरच निधी खर्च होत आहे का, हे पाहण्याची जबाबदारी समितीवर टाकण्यात आली आहे.
कुरुंदकर कोण होते, त्यांचे योगदान काय ?
नरहर कुरुंदकर बहुआयामी व्यक्तिमहत्त्व होते. किशोर वयात हैदराबाद मुक्तिसंग्रामात सक्रीय सहभाग घेतलेले कुरुंदकर लेखक, साहित्यिक, विचारवंत, वक्ते म्हणून राज्याला परिचित आहेत. त्यांनी लिहिलेली जागर, रूपवेध, मनुस्मृती, शिवरात्र, अभयारण्य, वाटा तुझ्या माझ्या ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. १५ जुलै १९३२ साली कुरुंदकरांचा जन्म परभणी जिल्ह्यातील नांदापूर (आता हिंगोली जिल्हा) येथे झाला. प्राथमिक शिक्षण वसमतला झाल्यानंतर ते त्यांच्या मामाच्या घरी हैदराबादला गेले आणि तिथे त्यांनी पुढील शिक्षण पूर्ण केले. कुरुंदकर राष्ट्रसेवा दलाचे कार्यकर्ते होते. हमीद दलवाईं यांच्याशी घट्ट मैत्री होती. आणीबाणी विरोधात त्यांनी जाहीर भूमिका घेतली होती. लोकांना लोकशाहीचे महत्त्व त्यांनी पटवून दिले. पीपल्स कॉलेजचे प्राचार्य झाल्यानंतर कार्यकर्तृवाच्या शिखरावर असताना १० फेब्रुवारी १९८२ रोजी व्यासपीठावरच हृदय विकाराचा धक्क्याने ऐन पन्नाशीत कुरुंदकर यांचा मृत्यू झाला.