मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यांना रविवारी अतिमुसळधार पावसाने झोडपले. मुंबई, ठाणेसह मराठवाडा, विदर्भ, उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात शनिवारी रात्रीपासूनच पावसाचा जोर अधिक होता. यादरम्यान बुलढाण्यात दोन घटनांत चौघे वाहून गेले, त्यात एकाचा मृत्यू, तिघे बेपत्ता आहेत. अहिल्यानगरमध्येही पुरात वाहून गेल्याने दोघांचा तर नाशिकमध्ये पावसामुळे भिंत कोसळून तिघांचा मृत्यू झाला.
दरम्यान, संपूर्ण राज्यात मंगळवारपासून पावसाचा जोर कमी होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यात व जायकवाडी धरण क्षेत्रात शनिवारी रात्रभर पाऊस झाल्याने मराठवाड्यातील अनेक गावांना पुराचा धोका वाढला आहे. मराठवाड्यातील १९६ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. कन्नड येथे मदन झब्बू राठोड (५५) हे ब्राह्मणी नदीत वाहून गेल्याची घटना घडली. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिस्थितीचा आढावा घेतला.
अहिल्यानगरमधील शिर्डी-राहाता शिवाराजवळ ओढ्यावरून जाताना दोन दुचाकीवरील चौघे पाण्यात वाहून गेले. या वेळी बचाव पथकाने अक्षय घोडे (२५) व अमोल व्यवहारे (रा. कोपरगाव) या दोघांना वाचवले. तर वाहून गेलेल्या प्रसाद विसपुते (रा. कोपरगाव) आणि रोहित खरात (वय २४, रा. पंधरा चारी, राहाता) यांचे मृतदेह सापडल्याची माहिती शिर्डी पोलीस ठाण्याचे निरीक्षक रणजीत गलांडे यांनी दिली.
बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा व मलकापूर तालुक्यांत रविवारी दोन वेगवेगळ्या घटनांत चार जण वाहून गेले. यातील एकाचा मृतदेह हाती लागला, इतर तिघांचा शोध सुरू आहे. नांदुरा तालुक्यातील निमगाव येथील ज्ञानगंगा नदीत पोहण्यासाठी गेलेले करण भुमरे (१८) आणि वैभव फुके (१९) वाहून गेले. त्यांचा शोध सुरू आहे. दुसरी घटना मलकापूर तालुक्यात घडली. शिवणी मार्गावरील निंबोळी गावानजीकच्या केसोबा मंदिर परिसरातील व्याघ्र नदीत पोहण्यासाठी गेलेले सोहम सोनोने (१६) आणि शुभम दवंगे (१४) बुडाले. शोधकार्यानंतर शुभमचा मृतदेह हाती लागला.
नाशिक जिल्ह्यात संततधार
नाशिक : सलग १५ ते २० तास कोसळलेल्या मुसळधार पावसाने नाशिक जिल्ह्यातील बहुतांश भागांना रविवारी जोरदार तडाखा दिला. एकाच दिवसात ११७ पैकी ९८ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग करावा लागल्याने गोदावरीसह दारणा, गिरणा, मोसम, कादवा आदी नद्यांंना पूर आला. सटाणा तालुक्यात घराची भिंत कोसळण्याच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांचा मृत्यू झाला. बागलाण तालुक्यातील खालचे टेंभे येथे भिंत कोसळून कस्तुराबाई अहिरे (७५) तसेच गोराणे येथे देवचंद सोनवणे (८०) आणि त्यांची सून निर्मला सोनवणे (३०) यांचा मृत्यू झाला. दोन जण जखमी झाले. मुसळधार पावसाने जिल्ह्यातील १८ धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग करावा लागला.
बीडमध्ये पुन्हा ‘एनडीआरएफ’ दाखल
बीड : बीड जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून, रविवारी सकाळी ४८ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जायकवाडीतून पाण्याचा विसर्ग दीड लाख क्युसेकपर्यंत वाढवण्याच्या संदर्भाने सूचना देण्यात आली होती. परिणामी जवळपास वाड्या-वस्त्या मिळून ६१ गावांना पुराने वेढण्याच्या भीतीने गेवराई, माजलगाव तालुक्यातील काही गावांतील नागरिकांनी स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. खबरदारी म्हणून मदतकार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक (एनडीआरएफ) व लष्कराचे पथकही जिल्ह्यात दाखल झाले आहे.
विशेष अधिवेशन बोलवा : जयंत पाटील
मुंबई : मराठवाडा, सोलापूरसह अनेक जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक गेले आहे. नद्यांना आलेल्या महापुरामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून या पार्श्वभूमीवर विधिमंडळाचे तीन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते आमदार जयंत पाटील यांनी राज्यपालांना पत्र लिहून केली आहे.
महामुंबईत मुसळधार
ठाणे : हवामान विभागाने मुंबईसह ठाणे जिल्ह्याला रविवारी ‘रेड अलर्ट’ जारी केला होता. परंतु, शनिवारी रात्रीपासूनच मुसळधार पाऊस कोसळण्यास सुरुवात झाली. मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, पालघर आदी भागांत रविवारी पावसाचा जोर कायम होता. अनेक भागांत १०० मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली.