मुंबई : राज्यात पुढील दोन ते तीन दिवस पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाल्यामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हलक्या सरींची शक्यता आहे. दरम्यान, मोसमी पाऊस देशातून पुढील काही दिवसांत माघार घेईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
मोसमी पावसाने राज्यातून माघार घेतली आहे. त्यामुळे अनेक भागात तापमानाचा पारा चढाच आहे. पश्चिम-मध्य अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. तसेच बंगालच्या उपसागरात देखील दक्षिण बांगलादेश आणि आसपासच्या प्रदेशात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. परिणामी राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, मोसमी पाऊस माघारी गेल्यापासून असह्य उकाडा सहन करावा लागत आहे. काही भागात तापामानाचा पारा ३५ अंशापार गेला आहे. त्यामुळे सध्या उकाडा आणि उन्हाचा तापही सहन करावा लागत आहे. दरम्यान. मोसमी पावसाने सोमवारी राज्याच्या बहुतांश भागातून माघार घेतली आहे. गडचिरोलीचा काही भागात मोसमी पावसाची वाटचाल खोळंबली आहे. मोसमी वाऱ्यांच्या परतीची सीमा कारवार, कलबुर्गी, निजामाबाद, चांदबली कंकर दरम्यान आहे.
मोसमी पावसाच्या परतीच्या प्रवासासाठी पोषक वातावरण असल्यामुळे पुढील दोन तीन दिवसात मोसमी पाऊस संपूर्ण देशातून माघार घेण्याचा अंदाज आहे. याचबरोबर राज्यातील काही भागात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मात्र, हा मोसमी पाऊस नसून मोसमी पाऊस माघारी गेल्यानंतर जो पाऊस पडतो तो पाऊस असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.
रत्नागिरी येथे सर्वाधिक तापमानाची नोंद
रत्नागिरी येथे मंगळवारी सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. तेथे ३५.५ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. त्याखालोखाल सांताक्रूझ येथे ३५.३ अंश सेल्सिअस, कुलाबा ३३.७ अंश सेल्सिअस , डहाणू ३३.९ अंश सेल्सिअस, अमरावती ३४.८ अंश सेल्सिअस, ब्रह्मपुरी ३४.९ अंश सेल्सिअस, लोहगाव ३४.२ आणि सोलापूर येथे ३४.७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.
पावसाचा अंदाज कुठे
वाऱ्यासह पावसाची शक्यता : रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, चंद्रपूर, गडचिरोली</p>