मुंबई : समाजमाध्यमावरून तरुणींशी मैत्री करून नंतर त्यांचा लैंगिक छळ करणाऱ्या एका विकृत आरोपीला दहिसर पोलिसांनी कर्नाटक येथून अटक केली. एआयद्वारे (कृत्रिम बुध्दीमत्ता) तयार केलेल्या अश्लील छायाचित्रांच्या आधारे मुलींना धमकावून तो अश्लील संभाषण (न्यूड व्हिडियो कॉल) करण्यास भाग पाडत होता. त्याने अशा प्रकारे अनेक मुलींची फसवणूक केली असून त्याच्या मोबाइलमध्ये पोलिसांना १३ हजार मुलींची छायाचित्रे आढळली.

इन्स्टाग्रामवर ओळख झालेला एक तरूण अश्लील छायाचित्रांच्या आधारे ब्लॅकमेल करीत असल्याची तक्रार १९ वर्षीय तरुणीने पोलिसांकडे केली होती. आरोपीने या मुलीशी मैत्री केल्यानंतर तिच्यावर न्यूड व्हिडियो कॉल करण्यासाठी दबाव टाकत होता. मुलीने नकार दिल्यानंतर त्याने पीडित मुलीच्या नावाने बनावट इन्स्टाग्राम पेज तयार केले आणि त्यावरून मुलीची कृत्रिम बुध्दीमत्तेच्या (एआय) आधारे तयार केलेली अश्लील छायाचित्रे आणि बदनामीकारक मजकूर प्रसारित केला.

याप्रकरणी दहिसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. हे प्रकरण तांत्रिक आणि संवेदनशील होते. दहिसर पोलिसांनी फेसबुक, इन्स्टाग्राम आणि गुगलकडून माहिती मागवली. खूप प्रयत्न केल्यानंतर पोलिसांना तांत्रिक माहिती मिळवण्यात यश आले. त्यावरून पोलिसांनी आरोपीचा आयपी ॲड्रेस मिळवून तांत्रिक तपास केला आणि कर्नाटकमधील बेल्लारी जिल्हातील सांदूर येथून शुभम कुमार मनोजप्रसाद सिंग (२५) याला अटक केली. तो सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो.

आरोपीच्या मोबाइलमध्ये १३ हजार मुलींची छायाचित्रे

याबाबत माहिती देताना दहिसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अब्दुल हक देसाई यांनी सांगितले की, आरोपीने दिल्ली येथून संगणकाचे विशेष प्रशिक्षण घेतले होते. मात्र त्याने या ज्ञानाचा गैरवापर करण्यास सुरवात केली. तो मुलींना इन्स्टाग्राम, फेसबुक आदी समाजमाध्यमावर रिक्वेस्ट पाठवून मैत्री करायचा. यासाठी तो कृत्रिम बुध्दीमत्तेच्या (एआय) मदतीने स्वत:चे आकर्षक छायाचित्रे तयार करून मुलींना भुरळ पाडायचा. त्यानंतर त्यांची छायाचित्रे मिळवून एआयच्या मदतीने त्यांचे अश्लील छायाचित्रात रूपांतरित करीत होता. या मुलींना तो अश्लील संभाषण (न्यूड व्हिडियो कॉल) करण्यास सांगायचा.

तसे न केल्यास त्यांना एआयच्या मदतीने तयार केलेली अश्लील छायाचित्रे वायरल करण्याची धमकी द्यायचा. त्याच्या मोबाइलमध्ये मुलींच्या नावाने तयार केलेले १०० हून अधिक बनावट इन्स्टाग्राम आयडी आढळले. त्याच्या मोबाइल गॅलरीत वेगवेगळ्या १३ हजार ५०० मुलींची छायाचित्रे आढळली. सध्या तो ५० हून अधिक मुलींशी बोलत होता. आम्ही पीडित मुलींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहोत. आरोपी सिंगने अशा प्रकारे लैंगिक छळ केलेल्या पीडित मुलींनी दहिसर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परिमंडळ १२ चे पोलीस उपायुक्त महेश चिमटे, दहिसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने, पोलीस निरीक्षक ए. एच. देसाई, सायबर कक्ष अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश दांडगे, महिला पोलीस उपनिरीक्षक श्रध्दा पाटील आदींच्या पथकाने कारवाई करून आरोपीला अटक केली.