मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी व देखभाल कामे करण्यासाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. परंतु, महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) गट क मुख्य परीक्षा, स्टेट बॅक ऑफ इंडिया (एसबीआय) लिपिक पूर्व परीक्षा, व्यवस्थापन अभियोग्यता चाचणी (एमएटी), पीबीटी परीक्षा रविवारी आहे. या परीक्षाना बसणाऱ्यांना लोकलच्या रविवारच्या वेळापत्रकाचा फटका बसण्याची चिन्हे आहेत. पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक असून रविवारी दिवसकालीन कोणताही ब्लाॅक नसेल. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

मध्य रेल्वे मुख्य मार्ग

कुठे : ठाणे कल्याण स्थानकांदरम्यान अप व डाऊन जलद मार्गावर

कधी : रविवारी सकाळी १०.४० पासून दुपारी ३.४० पर्यंत

परिणाम : सकाळी ९.३४ ते दुपारी ३.०३ दरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या डाऊन जलद /अर्धजलद लोकल ठाणे – कल्याणदरम्यान डाऊन धिम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत. या लोकल त्यांच्या नियोजित थांब्यांव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांवर थांबतील. सकाळी १०.२८ ते दुपारी ३.४० दरम्यान कल्याण येथून सुटणाऱ्या अप जलद /अर्धजलद लोकल कल्याण – ठाणेदरम्यान अप धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल त्यांच्या नियोजित थांब्यांव्यतिरिक्त दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांवर थांबतील. पुढे मुलुंड स्थानकापासून पुन्हा अप जलद मार्गावर वळविण्यात येतील.

हार्बर मार्ग

कुठे : पनवेल – वाशी स्थानकांदरम्यान (पोर्ट मार्गिका वगळून) अप आणि डाऊन मार्गावर

कधी : सकाळी ११.०५ पासून दुपारी ४.०५ पर्यंत

परिणाम : सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ दरम्यान हार्बर मार्गावर पनवेल येथून सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील लोकल; तसेच सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ दरम्यान सीएसएमटी येथून बेलापूर/पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गिकेवरील लोकल रद्द करण्यात येणार आहेत.

ट्रान्स हार्बर मार्ग

कुठे : पनवेल – ठाणे अप आणि डाऊन मार्गावर

कधी : सकाळी ११.०२ पासून दुपारी ३.५३ पर्यंत

परिणाम : सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ दरम्यान पनवेल येथून ठाण्याकडे जाणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकल, तसेच सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० दरम्यान ठाणे येथून पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकल रद्द करण्यात येणार आहेत. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – वाशीदरम्यान विशेष लोकल चालवण्यात येतील. ब्लॉक कालावधीत ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकल सेवा ठाणे – वाशी/नेरुळ दरम्यान सुरू राहील. ब्लॉक कालावधीत पोर्ट मार्गावरील लोकल सेवा उपलब्ध राहील.

पश्चिम रेल्वे

कुठे : वसई – विरार स्थानकादरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर

कधी : शनिवारी रात्री १२.१५ – पहाटे ४.१५ दरम्यान

परिणाम : ब्लाॅक कालावधीत वसई – विरार स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील सर्व लोकल जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. ब्लाॅक काळात काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत. तर, रविवारी दिवसकालीन कोणताही ब्लाॅक नाही.