मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाकडून ठाणे, कल्याण, नवी मुंबई, वसईसह अन्य ठिकाणच्या ५ हजार २८५ घरांसह ७७ भूखंडांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार या सोडतीची नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृतीसाठी सोमवार, १४ जुलैपासून सुरुवात झाली आहे. अर्जविक्री-स्वीकृतीस सुरुवात झाल्यापासून पहिल्या सहा दिवसात सोडतीला बरा प्रतिसाद मिळाला आहे. पहिल्या सहा दिवसात अनामत रक्कमेसह २ हजार ७७२ अर्ज सादर झाले आहेत.

कोकण मंडळाकडून २०२५ साठीची पहिली सोडत जाहिर झाली आहे. या सोडतीत २० टक्के सर्वसमावेश योजनेतील ५६५ घरे,१५ टक्के एकात्मिक योजनेतील ३००२ घरे, म्हाडाच्या विखुरलेल्या योजनेतील १६७७ घरे आणि म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजनेतील (५० टक्के परवडणार्या सदनिका)४१ घरे अशा एकूण ५ हजार २८५ घरांसह ७७ भूखंडांचा समावेश आहे. सोमवार, १४ जुलैपासून या सोडतीसाठीची नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृतीला म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या हस्ते आरंभ करण्यात आला आहे.

इच्छुकांना १४ आॅगस्टपर्यंत अनामत रक्कमेसह अर्ज भरता येणार आहेत. तर पात्र अर्जदारांची अंतिम यादी १ सप्टेंबरला प्रसिद्ध करण्यात येणार असून ३ सप्टेंबर सकाळी १० वाजता ठाण्यातील डाॅ काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात सोडतीचा निकाल जाहिर केला जाणार आहे. अर्जविक्री-स्वीकृतीला सुरुवात झाल्यापासून पहिल्या सहा दिवसात या सोडतीला बरा प्रतिसाद मिळाला आहे. रविवारी सकाळी १०.४५ वाजेपर्यंत ५ हजार २८५ घरांसह ७७ भूखंडांसाठी एकूण ८ हजार १८९ इच्छुकांनी अर्ज भरले आहेत. तर या ८ हजार १८९ अर्जदारांपैकी अनामत रक्कमेसह २ हजार ७७२ अर्जदारांनी अर्ज सादर केल्याची माहिती कोकण मंडळातील वरिष्ठ अधिकार्यांनी दिली.

पहिल्या सहा दिवसातील हा प्रतिसाद समाधानकारक असल्याचे म्हाडाचे म्हणणे आहे. कोकण मंडळातील म्हाडा विविध योजनेतील घरांना प्रतिसाद मिळत नसल्याने अंदाजे १३ हजार घरांची विक्री प्रथम येणार्यास प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत आणि बुक माय होम द्वारे सुरु आहे. इतक्या मोठ्या संख्येने घरे रिक्त असताना कोकण मंडळाने आता ५ हजार २८५ घरांसह ७७ भूखंडांसाठी सोडत काढली आहे. या सोडतीत खासगी विकासकांच्या प्रकल्पातील ५६५ घरांचा समावेश आहे. खासगी विकासकांच्या घरांना सोडतीत नेहमीच चांगला प्रतिसाद मिळतो. त्यामुळे यावेळीही या घरांना चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे यावेळी कोकण मंडळाने आपल्या योजनेतील विखुरलेली १६७७ घरे समाविष्ट केली आहेत. ही घरे जूनी, विकली न गेलेली आहे. त्यामुळे या घरांना कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. दरम्यान विखुरलेल्या घरातीतील बाळकुम योजनेतील २८ घरांचा समावेश आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ज्या संकेत क्रमांकांतील ही घरे आहेत, त्या संकेत क्रमांकातील घरांची विक्री २०२३ मध्ये ५९ लाखांत करण्यात आली आहे. या घरांची मूळ किंमत २०१८ मध्ये ४३ लाख होती. पण आता २०२५ च्या सोडतीत ही घरे थेट ८४ लाखांत विकली जाणार आहेत. या घरांच्या किंमतीत भरमसाठ वाढ झाल्याने इच्छुकांमध्ये नाराजी आहे. तर दुसरीकडे चितळसर मानपा़ड्यातील घरांच्या किंमतीही ५१ ते ५२ लाख असून या किंमतीवरही इच्छुकांची नाराजी आहे. तेव्हा बाळकुम आणि चितळसर मानपाड्यातील घरांना कसा प्रतिसाद मिळतो हे १ सप्टेंबरला स्पष्ट होईल.