मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या विविध ठिकाणच्या ५ हजार २८५ सदनिकांसह ७७ भूखंडांच्या नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रियेस सोमवारपासून सुरुवात झाली आहे. त्यानुसार आता इच्छुकांना १४ आॅगस्टपर्यंत अनामत रक्कमेसह अर्ज भरता येणार आहे. या सोडतीत रु. ९ लाख ६८ हजारांपासून घरांचा समावेश आहे.
कोकण मंडळाच्या २०१८ च्या सोडतीतील बाळकुम योजनेतील मध्यम गटातील २८ घरे विकली गेली नसून या घरांचा समावेश चालू सोडतीत विखुरलेल्या योजनेत करण्यात आला आहे. मात्र त्याचवेळी या घरांच्या किंमती अव्वाच्या सव्वा करण्यात आल्या आहेत. बाळकुमधील घरांच्या किंमती रु. ८४ लाख ८५ हजार ६१० अशा आकारण्यात आल्या असून ही घरे महागडी असल्याचे म्हटले जात आहे.
ठाणे, कल्याण, वसई, नवी मुंबईतील घरांचा समावेश
कोकण मंडळाकडून २० टक्के योजनेतील ५६५, १५ टक्के एकात्मिक योजनेतील ३००२, म्हाडाच्या विखुरेलल्या योजनेतील १६७७ आणि म्हाडा कोकण गृहनिर्माण योजनेतील (५०टक्के परवडणार्या सदनिका) ४१ अशा एकूण ५ हजार २८५ घरांसह ७७ भूखंडांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर केली आहे. सोमवारपासून या सोडतीसाठीच्या नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृतीला सुरुवात झाली. म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या हस्ते म्हाडा भवनात एका कार्यक्रमात सोडतपूर्व प्रक्रियेस सुरुवात करण्यात आली. या सोडतीत अत्यल्प, अल्प आणि मध्यम गटासाठीच्या घरांचा समावेश आहे.
२० टक्के योजनेअंतर्गत खासगी विकासकांकडून कौसा, डायघर, गोलवली (डोंबिवली), गांधरे (कल्याण), टिटवाळा, तीसगाव (कल्याण) कांचनगाव (डोंबिवली पूर्व), नांदिवली (ठाणे), दिघा (नवी मुंबई), नेरूळ, घणसोली, पिसवली (कल्याण), ओवळे (ठाणे), सातवली (वसई) आदी ठिकाणच्या ५६५ घरांचा समावेश आहे. अत्यल्प आणि अल्प गटातील ही घरे असून या घरांच्या रु. ९ लाखांपासून रु. ३३ लाख ९६ हजारांच्या घरातील आहेत. तर १५ टक्के एकात्मिक योजनेतील घरे उसरघर, सांडप, ठाणे आणि घारीवली, कल्याण येथे असून ही एकूण घरे ३००२ इतकी आहेत. उसरघर, सांडपमधील घरांच्या रु. १३ लाख ४० हजार ते रु. १९ लाख १३ हजारदरम्यान आहेत. तर घारीवलीतील घरांच्या किंमती रु. २१ लाख ३७ हजार ते रु. २१ लाख ९८ हजार अशा आहेत.
बाळकुमधील घरांच्या किंमतीत मोठी वाढ
सोडतीत म्हाडा कोकण मंडळाच्या योजनेतील विखुरलेल्या, विकल्या न गेलेल्या १६७७ घरांचा समावेश आहे. मात्र ही घरे महाग असल्याचे चित्र आहे. मिरारोडमधील अल्प गटातील ३०. ९४ चौ. मीटरच्या घरांसाठी विजेत्यांना ५२ लाख ९९ हजार २७४ रुपये मोजावे लागणार आहेत. चितळसर, मानपाडामधील ३२.६६ ते ३३.१० चौ.मीटरच्या घरांसाठी विजेत्यांना ५१ लाख ८३ हजार ९८० रुपये ते ५२ लाख ५४हजार ६९५ रुपये मोजावे लागणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे कोकण मंडळाच्या २०१८ च्या सोडतीतील बाळकुमधील रिक्त २८ घरांचा समावेश या सोडतीत आहे. ६७.०७ चौ. मीटरच्या मध्यम उत्पन्न गटातील या घरांची विक्री किंमत २०१८ मध्ये ४३ लाख ४५ हजार २३६ रुपये अशी होती. मात्र या घरांसाठीच्या विजेत्यांना २०२३ मध्ये घरांचा ताबा देताना या घरांची किंमत थेट १६ लाख २९ हजार ५६४ वाढवत ती ५९ लाख ७४ हजार ८०० रुपये अशी करण्यात आली. यावर विजेत्यांनी नाराजी दर्शवत न्यायालयीन लढाईही लढली.
मात्र त्यात त्यांना यश आले नाही आणि शेवटी याच किंमतीत विजेत्यांना घरे घ्यावी लागली. आता याच योजनेतील शिल्लक २८ घरांच्या किंमती चालू सोडतीत थेट ८४ लाख ८५ हजार ६१० अशा आहेत. दोन वर्षात घरांची किंमत मंडळाने २४ लाखांनी वाढवली आहे. त्यामुळे बाळकुमची घरे सर्वात महागडी ठरली आहेत.
याविषयी कोकण मंडळाच्या अधिकाऱयांना विचारले असता त्यांनी नियमानुसारच किंमती निश्चित करण्यात आल्याचे सांगितले. मात्र त्याचवेळी या ठिकाणच्या बाजारभावानुसार, विकासकांच्या घरांच्या किंमतींच्या तुलनेत ही घरे स्वस्त असल्याचा दावा केला.