मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या अखत्यारितील विक्रीवाचून रिक्त घरांची विक्री ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ योजनेअंतर्गत सुरू आहे. आता मंडळाने दोन हजार घरांची सोडत काढण्याची तयारी सुरू केली आहे. ठाणे, कल्याणसह अन्य ठिकाणच्या घरांचा त्यात समावेश करण्यात येणार असून या सोडतीसाठी ऑगस्टमध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्याचे कोकण मंडळाचे नियोजन आहे.

कोकण मंडळातील विरार-बोळींज, खोणी, शिरढोणसह अन्य ठिकाणच्या घरांची काही कारणांमुळे विक्री होऊ शकलेली नाही. त्यामुळे या घरांची विक्री ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ योजनेअंतर्गत ‘बुक माय होम’ संकल्पनेनुसार केली जात आहे. बुक माय होम योजनेस ३० एप्रिलपासून सुरुवात झाली असून या योजनेअंतर्गत १३ हजार ३९५ घरांची विक्री करण्यात येणार आहे. ही सर्व घरे रिक्त घरे आहेत. या योजनेला हळूहळू प्रतिसाद मिळत असल्याचा दावा मंडळाकडून करण्यात येत आहे. आता मंडळाला २० टक्के सर्वसमावेश गृहयोजनेतील काही घरे उपलब्ध झाली असून पंतप्रधान आवास योजना, म्हाडा गृहनिर्माण योजनेतील काही घरे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे कोकण मंडळाने आता दोन हजार घरांची सोडत काढण्याचा निर्णय घेतल्याची माहिती कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी दिली. ठाणे, कल्याण, शिरढोण, गोठेघर, भंडार्ली आणि अन्य ठिकाणच्या घरांचा यात समावेश असल्याचेही त्यांनी सांगितले.

निवडणुकांपूर्वी सोडतपूर्व प्रक्रियेला सुरुवात

मुंबईसह राज्यभरात महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबरनंतर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीच्या आधी सोडत जाहीर करून सोडतपूर्व प्रक्रियेला अर्थात नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रियेस सुरुवात करण्याचे कोकण मंडळाचे नियोजन आहे. तर निवडणुकांनंतर प्रत्यक्ष सोडत काढण्याची शक्यता आहे. त्यानुसार मंडळाने दोन हजार घरांची सोडत काढण्याच्यादृष्टीने तयारीला वेग दिला आहे. जाहिरातीची तयारी पूर्ण करून, किंमत आणि घरांची संख्या अंतिम करून ऑगस्टमध्ये सोडतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली जाईल, असेही गायकर यांनी सांगितले. या सोडतीत २० टक्के योजनेसह पीएमएवाय, म्हाडा गृहनिर्माण योजनेतील घरांचा समावेश असणार आहे. तर अत्यल्प, अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील घरांचा त्यात समावेश आहे. कोकण मंडळाकडून सोडत जाहीर होणार असल्याने नागरिकांना ठाणे, कल्याणसह कोकणात अन्य ठिकाणी हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.