मुंबई : म्हाडाच्या पुणे मंडळाच्या ६०५८ घरांच्या सोडतीतील प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वावरील घरांना यंदाही थंड प्रतिसाद मिळाला आहे. ३०१० पैकी दीड हजारांहून अधिक घरांना शून्य प्रतिसाद मिळाला आहे. प्रथम प्राधान्य तत्वावरील सर्व घरे हे तीन ते सहा वेळेस सोडत काढूनही विकली न गेलेली अशी घरे आहेत. आताही या घरांना प्रतिसाद न मिळाल्याने ही घरे पुणे मंडळासाठी डोकेदुखी ठरत आहेत. या पार्श्वभूमीवर आता या घरांची विक्री खासगी संस्थेच्या माध्यमातून करण्याची वेळ मंडळावर आली आहे. त्यानुसार ताथवडेतील अंदाजे ४७६ आणि म्हाळुंगे येथील अंदाजे १०१७ घरांची विक्री खासगी संस्थेच्या माध्यमातून करण्याचा निर्णय मंडळाने घेतला असून, त्यासाठी संस्था अंतिम करण्यात आली आहे.

तीन ते सहा वेळा सोडतीत समाविष्ट करूनही विकली न गेलेली ३०१० घरे पुणे मंडळाच्या ७ मार्चच्या सोडतीत प्रथम प्राधान्य योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. या घरांसाठी अनामत रक्कमेसह अर्ज करण्याची मुदत संपली आहे. दरम्यान आकडेवारीनुसार, ३०१० घरांसाठी २३५६ अर्ज सादर झाले आहेत. दीड हजारांहून अधिक घरांना शून्य प्रतिसाद मिळाला आहे.

हेही वाचा – मुंबई: मंत्र्यांचा शेरा अंतिम समजू नये हा आदेश अजब! अजित पवार यांचा मुख्यमंत्र्यांना टोला

चाकण-म्हाळुंगे येथील अल्प गटासाठी २८६ घरे असताना त्यासाठी केवळ ६९ अर्ज सादर झाले आहेत. तेथील अन्य टप्प्यातील अल्प गटातील ४९४ घरांसाठी केवळ १२५, मध्यम गटातील ४८३ घरांसाठी केवळ ५२ अर्ज सादर झाले आहेत. ताथवडे येथील मध्यम गटातील ६५४ घरांसाठी १७८, पिंपरे-वाघिरे येथील मध्यम गटातील २३० घरांसाठी १५५, उच्च गटातील १४४ घरांसाठी १०९, सांगलीतील अत्यल्प गटातील ५२ घरांसाठी ३६, सोलापूरमधील मध्यम गटातील ५६ घरांसाठी ३ अर्ज सादर झाले आहेत. यासह अन्यही काही घरांना शून्य प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे आता दीड हजारांहून अधिक घरांच्या विक्रीचा प्रश्न मंडळासमोर उभा ठाकला आहे.

हेही वाचा – संजय राऊतांविरोधात हक्कभंग दाखल करण्याची भाजपाची मागणी, विधानसभा अध्यक्षांनी दिलं पत्र; विधिमंडळाला चोरमंडळ म्हणणं भोवणार?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा प्रश्न सोडविण्यासाठी मंडळाने खासगी संस्थेच्या माध्यमातून घरांची विक्री करण्याचा पर्याय पुढे आणला असून, इनोव्हेटिव्ह या संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे.