मुंबई : म्हाडाचे कोकण मंडळ अंबरनाथमधील मौजे मोरिवली येथे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत १०४ घरे बांधणार आहे. मात्र बांधकामाला सुरुवात करण्यापूर्वीच या घरांना मागणी आहे का याची चाचपणी करण्याचा निर्णय कोकण मंडळाने घेतला आहे. त्यासाठी कोकण मंडळाने गुरुवारी एक जाहिरात प्रसिद्ध केली असून त्या माध्यमातून मागणी जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येणार आहे. इच्छुकांनी या सर्वेक्षणात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कोकण मंडळाकडून करण्यात आले आहे.
कोकण मंडळाने मिरारोड, विरार, ठाणे, कल्याण, अंबरनाथ, खोणी, शिरढोण, भंडार्ली अशा अनेक ठिकाणी गृहप्रकल्प राबविले आहेत. मात्र विरार-बोळींज, खोणी, शिरढोण, भंडार्ली आदी ठिकाणच्या म्हाडाच्या घरांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. परिणामी, १० हजारांहून अधिक घरे विक्रीविना पडून आहेत. ही घरे विकण्यासाठी मंडळाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र त्यानंतरही घरांना प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे आता म्हाडाने कोकण विभागात नवीन गृहनिर्मिती करण्यापूर्वी तेथील मागणी विचारात घेऊन घरांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार अंबरनाथ येथील कोहिज खुंटवली येथे अत्यल्प गटासाठी १ हजार ६०६ घरे आणि शिवगंगा नगर येथे अत्यल्प गटासाठी १५१ घरे आणि मध्यम गटासाठी ७७४ घरे बांधण्यासाठी फेब्रुवारीमध्ये सर्वेक्षण सुरू केले होते. या सर्वेक्षणात दोन्ही प्रकल्पांसाठी साडेचार हजार नागरिकांनी प्रतिसाद दिल्याची माहिती कोकण मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. हा प्रतिसाद चांगला असल्याने आता लवकरच या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात करण्याचे कोकण मंडळाचे नियोजन आहे. आता अंबरनाथमध्ये आणखी एक गृहनिर्मिती प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून या प्रकल्पास सुरुवात करण्यापूर्वीच तेथे घरांची मागणी आहे का हे तपासण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. त्यानुसार मंडळाने गुरुवारी एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
अंबरनाथमधील मोरीवली यथे पीएमएवाय योजना (शहरी) २.० अंतर्गत १०४ घरे बांधण्यात येणार आहेत. अत्यल्प गटासाठी ही घरे असून घरांचे क्षेत्रफळ ३३० चौरस फूट असेल. घरांची मागणी नोंदवण्यासाठी इच्छुकांना १७ जून पर्यंत http://demandassessmentcitizenmhada.gov.in या संकेतस्थळावर अर्ज सादर करावा लागणार आहे. या सर्वेक्षणात अधिकाधिक नागरिकांना सहभागी व्हावे, असे आवाहन मंडळाने केले आहे. या प्रकल्पाला चांगली मागणी असल्यास तो मार्गी लावला जाणार आहे.