मुंबई : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या समोरील अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे. सभागृह तहकूब झाल्यानंतर भ्रमणध्वनीवर रमी खेळाची जाहिरात पुढे करीत होतो, असा दावा कोकाटे यांनी केला होता. पण, रोहित पवार यांनी मंगळवारी पुन्हा समाज माध्यमांवर प्रसारीत केलेल्या दोन चित्रफितींमध्ये कोकाटे विधान परिषदेचे कामकाज सुरू असताना भ्रमणध्वनीवर रमी खेळत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेत समाज माध्यमात चित्रफीत प्रसारीत करणाऱ्यांवर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्यासह कायदेशीर कारवाई करण्याचे जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार) आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी पुन्हा माणिकराव कोकाटे यांच्या दोन चित्रफिती समाज माध्यमांवर प्रसारीत केल्या आहेत. त्यात विधान परिषदेत आदिवासी विभागाच्या एका प्रश्नावर चर्चा सुरू असताना कोकाटे रमी खेळत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे सभागृह तहकूब झाल्यानंतर भ्रमणध्वनी पाहत असल्याचा कोकाटे यांचा दावा सपशेल खोटा असल्याचे दिसून येत आहे.
कृषिमंत्र्यांचे विधान धडधडीत खोटे – रोहित पवार
रोहित पवारांनी आपल्या समाज माध्यमावरील संदेशात म्हटले आहे, सभागृहाचे कामकाज संपले होते, हे कृषिमंत्री यांचे विधान धडधडीत खोटे आहे. उलट आदिवासी बांधवांना दुधाळ जनावरे देण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सभागृहात चर्चा सुरू होती, पण ‘ओसाड गावच्या पाटलांना’ या चर्चेत रस नसावा आणि मला सांगा पत्त्याची कोणती जाहिरात पुढे ढकलण्यासाठी (स्कीप) ४२ सेकंद लागतात हो ? कोकाटे आज राजीनामा देऊन शेतकऱ्यांवर ते उपकार करतील, असे वाटत होतं पण ‘गिरे तो भी टांग उपर’ अशी भूमिका घेत कोर्टात जाण्याची भाषा केली, हे दुर्दैव आहे.
मंत्री महोदय स्वतःला वाचवण्यासाठी जेवढा खटाटोप करत आहेत, त्यापेक्षा दिलेल्या पदाला न्याय देण्यासाठी केला असता तर ही वेळ आली नसती. विधिमंडळाची अप्रतिष्ठा होऊ नये म्हणून आवाज असलेली ही चित्रफीत प्रसारीत करणे टाळत होतो, पण मंत्री महोदयांनी कोर्टात जाण्याची भाषा केल्याने नाईलाजाने मला सत्य जनतेच्या कोर्टात आणावे लागले. आता चौकशी करायचीच तर कृषिमंत्री पत्ते खेळत होते की, नाही याचीही चौकशी करावी आणि ही चौकशी निष्पक्ष पद्धतीने होण्यासाठी नैतिकता दाखवून कोकाटे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही रोहित पवार यांनी केला आहे.
केंद्रीय कृषिमंत्र्यांकडे तक्रार
महाविकास आघाडीच्या खासदारांनी मंगळवारी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांची भेट घेतली. महाराष्ट्राच्या विधिमंडळात रमी खेळणारा तसेच सातत्याने शेतकरी विरोधी भूमिका मांडणारा कृषिमंत्री राज्याला नको. त्यांनी आपल्या विधानांमुळे महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासण्याचे काम केले आहे. त्यांच्या असंवेदनशील वागण्यामुळे महाराष्ट्राचे मोठे नुकसान होत आहे, त्यांचा तातडीने राजीनामा घेऊन त्यांच्याऐवजी संवेदनशील आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असणारा संवेदनशील कृषिमंत्री महाराष्ट्राला द्यावा, अशी मागणी केल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी समाज माध्यमांवरील संदेशात म्हटले आहे.
संपन्न राज्याला भिकारी म्हणणे असंवेदनशील
शासनकर्त्यांनी आणि राज्यातील जनतेने कठोर परिश्रम करुन हा महाराष्ट्र देशातील सर्वात संपन्न राज्य बनविले. त्या राज्याला भिकारी म्हणणे हा असंवेदनशीलतेचा कहर आहे. हा राज्याचे आतापर्यंतचे मुख्यमंत्री आणि राज्यातील जनतेच्या परिश्रमाचा अपमान आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न ज्वलंत असताना शेतकऱ्यांच्या प्रती अतिशय असंवेदनशील वागणारे कृषिमंत्री राज्याने कधीही पाहिले नव्हते. कृषिमंत्र्यांचा राजीनामा घेऊन खाते शेती आणि शेतकऱ्यांप्रती संवेदनशीलतेने वागणाऱ्या व्यक्तीकडे द्या, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार) कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी केली आहे.