scorecardresearch

मोठी बातमी! मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावर ठाकरे सरकारने आज बोलावली सर्वपक्षीय बैठक; मात्र राज ठाकरे…

राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेमध्ये उपस्थित केलेल्या मशिदींवरील भोंग्यांसंदर्भातील मुद्द्यावर आज बैठक

mosque loudspeakers issue
आज बोलावण्यात आलीय ही बैठक (फाइल फोटो)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेमध्ये उपस्थित केलेल्या मशिदींवरील भोंग्यांसंदर्भातील मुद्द्यावर राज्य सरकारने सर्व पक्षीय बैठक बोलावली आहे. मात्र आता राज्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत असणाऱ्या माहविकास आघाडी सरकारने बोलावलेल्या या बैठकीला राज ठाकरेच उपस्थित राहणार नसल्याचं मनसेचं स्पष्ट केलंय.

मशिदींवरील भोंग्यांसंदर्भातील विषयावर चर्चा करण्यासाठी आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे. मात्र या बैठकीला राज ठाकरे उपस्थिती राहणार नसल्याचं मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना स्पष्ट केलंय.

राज्याच्या गृहविभागामार्फत आज भोंग्यांच्या विषयावर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीला राज्यातील सर्व प्रमुख पक्षांच्या नेत्यांना आमंत्रित करण्यात आलंय. भोंग्यांसदर्भात राजकीय पक्षांच्या भूमिका समजून घेत राज्य सरकारची भूमिका काय आहे हे या बैठकीत मांडलं जाणार आहे. मात्र आता ठाकरे सरकारच्या या बैठकीला ज्या राज ठाकरेंच्या भाषणामुळे हा भोंग्यांचा मुद्दा पुन्हा उपस्थित झाला ते राज ठाकरेच उपस्थित नसतील हे स्पष्ट झालं आहे.

मनसेच्या वतीने या बैठकीला मनसेचे नेते संदीप देशपांडे, बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई उपस्थित राहणार असल्याचंही मनसेनं स्पष्ट केलं आहे. राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी रमजान ईद म्हणजेच ३ मे पर्यंतचा अल्टीमेट ठाकरे सरकारला दिलाय. याच पार्श्वभूमीवर आता ही बैठक घेतली जात असून सरकारची भूमिका विरोधी पक्षांबरोबरच सत्ताधारी घटक पक्षांपर्यंत पोहचवण्याचा हेतू या बैठकीच्या माध्यमातून साध्य करण्याचा गृहमंत्रालयाचा प्रयत्न आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mns chief raj thackeray to not participate in the all party meeting called by the state government to resolve the loudspeaker dispute scsg