नाशिक-औरंगाबाद रस्त्यावर आज पहाटे खासगी बसला झालेल्या अपघातानंतर बस पेटला होता. यात १३ जणांचा मृत्यू झाला असून १७ प्रवासी जखमी झाले आहेत. दरम्यान अपघाताबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. या अपघाताची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे.
हेही वाचा – नाशिकमध्ये भीषण दुर्घटना!, खासगी बसला आग लागून १३ जणांचा मृत्यू; मृतांची संख्या वाढण्याची भीती
काय म्हणाले राज ठाकरे?
राज ठाकरे यांनी या अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशांना श्रद्धांजली वाहिली आहे. “आज नाशिक-नांदूरनाका इथे झालेला खासगी बसचा अपघात भीषण आहे. या अपघातात मृत झालेल्या प्रवाशांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली. मृतांच्या नातेवाईकांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. अपघातात जखमी झालेले प्रवासी लवकर बरे होऊ देत ही आई जगदंबे चरणी प्रार्थना”, असे ट्वीट राज ठाकरे यांनी केले आहे.
“या अपघाताची सखोल चौकशी व्हायला हवी. गेल्या काही दिवसांत रस्त्यावरील अपघातांचं प्रमाण वाढते आहे. याकडे राज्य सरकारने लक्ष द्यायला हवे”, अशी मागणीही त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
हेही वाचा – नाशिकमध्ये दुसरी बस दुर्घटना : धावत्या बसने घेतला पेट; चालक-वाहकासह प्रवाशांनी मारल्या उड्या
पहाटेच्या सुमारास झाला अपघात
आज पहाटेच्या सुमारा नाशिक-औरंगाबाद रस्त्यावर चिंतामणी ट्रॅव्हस या खासगी बसला डंपरने धडक दिल्याने अपघतात झाला होता. या धडकेनंतर डिझेलची टाकी फुटल्याने बसने पेट घेतला. यवतमाळहून ही बस मुंबईला निघाली होती. या बसमध्ये ४८ प्रवासी होते. काहींनी उड्या मारल्याने ते बचावल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे.