मुंबई : मोसमी पावसाने काही भाग वगळता राज्यातून माघार घेतली आहे. त्यामुळे तापमानातही गेल्या काही दिवसांपासून वाढ झाली आहे. दरम्यान, गुरुवारी कोकणासह मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यात हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यानुसार काही भागात पावसाच्या सरी बरसतील.

नैऋत्य बंगालच्या उपसागरातील चक्राकार वाऱ्याची स्थिती कोमोरीन भागाकडे असल्याने लक्षद्वीप, केरळ, दक्षिण कर्नाटकच्या किनाऱ्यालगत रविवारपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाला पोषक वातावरण निर्माण झाली आहे. परिणामी गुरुवारपासून पुढील दोन दिवस काही भागात हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज आहे. काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पाऊस पडेल. दरम्यान, पाऊस माघारी गेल्यानंतर उन्हाचा ताप सहन करावा लागत आहे.

पहाटे गारवा आणि नंतर मात्र उन्हाचा चटका असे वातावरण सध्या मुंबईसह इतर भागात अनुभवायला मिळत आहे. हवामान विभागाच्या सांताक्रूझ केंद्रात बुधवारी २२.२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. हे तापमान सरासरीपेक्षा २.१ अंशापेक्षा कमी नोंदले गेले. मात्र कमाल तापमान ३४.९ अंश सेल्सिअस नोंदले गेले. परिणामी पहाटे गारवा आणि दिवसा उन्हाचा ताप असे वातावरण आहे. रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील काही भागात बुधवारी देखील हलक्या ते मध्यम सरी बरसल्या.

मुंबईसह ठाणे आणि पालघर भागात गुरुवारी हलक्या सरींचा अंदाज आहे. तर रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मोसमी पाऊस एक दोन दिवसात देशातून माघार घेईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मोसमी वाऱ्यांची सीमा बुधवारी कारवार, कलबुर्गी, निजामाबाद, कांकेर, चांदबली दरम्यान होती.

चंद्रपूर येथे सर्वाधिक तापमानाची नोंद

चंद्रपूर येथे बुधवारी सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. तेथे ३६.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. हे तापमान सरासरीपेक्षा ३.४ अंशांनी अधिक होते. त्याखालोखाल रत्नागिरी येथे ३५.६ अंश सेल्सिअस, सांताक्रूझ येथे ३४.९, डहाणू ३३.२ अंश सेल्सिअस, अकोला ३४.६ अंश सेल्सिअस, अमरावती ३४.६ अंश सेल्सिअस