मुंबई: मध्य रेल्वेवरील मुंबई विभागातील मोटरमन पुन्हा एकदा कामाच्या अतिरिक्त ताणामुळे मूक निदर्शने करण्याच्या तयारीत आहेत. रिक्त पदामुळे मोटरमनांना जादा काम करावे लागते. परंतु, यामुळे त्यांचे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ बिघडत आहे. तसेच, दीर्घकाळापासून मोटरमनच्या अनेक तक्रारी प्रलंबित आहेत. परिणामी, ४ मेपासून नियमांनुसार काम करण्याचा आणि कोणतेही ‘जादा काम’ न करण्याचा निर्णय समस्त मोटरमननी घेतला आहे.

परिणामी, प्रवाशांना सोमवारी मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. लोकल फेऱ्यांवर परिणाम होऊन त्याचा फटका प्रवाशांना बसण्याची शक्यता आहे.मध्य रेल्वेवर दररोज १,८०१ लोकल फेऱ्या धावतात. या सर्व लोकल फेऱ्या चालवण्यासाठी मध्य रेल्वेकडे पुरेसे मोटरमन नाहीत. त्यामुळे मोटरमनला जादा काम करून, फेऱ्या चालवाव्या लागतात. तसेच, मोटरमन केबिनमध्ये ॲडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम (एडीएएस) प्रणाली बसविण्यात आली आहे. या प्रणालीद्वारे मोटरमनवर सतत कॅमेऱ्याच्या माध्यमातून लक्ष ठेवले जाते. यामुळे मोटरमनचे लक्ष विचलित होण्याची शक्यता असते.

तसेच नव्या प्रणालीमुळे मोटरमनला हाताने इशारे करून सिग्नल क्रमांक सांगावे लागतात. परंतु, लोकल चालविताना अशा क्रिया करणे मोटरमनला शक्य होत नाही. त्यामुळे रेल्वेच्या कामकाजात अडथळा निर्माण होऊ शकतो. मोटरमन कॅबमध्ये कॅमेरे बसवून, प्रामाणिकपणा आणि सचोटीने काम करणाऱ्या मोटरमनवर संशय व्यक्त केला जात आहे, असे मत सेंट्रल रेल्वे मजदूर संघाने (सीआरएमएस) व्यक्त केले.

त्यामुळे रविवारपासून जादा काम न करण्याचा निर्णय मोटरमन आणि रेल्वे कर्मचारी संघटनांनी घेतला आहे. रविवारी लोकल फेऱ्यांची संख्या तुलनेने कमी असते, त्यामुळे या नियमानुसार काम आंदोलनाचा मोठा परिणाम होणार नाही. परंतु, मोटरमनचे आंदोलन सोमवारी सुरूच राहिले तर लोकल सेवेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. लोकल रद्द झाल्या आणि विलंबाने धावल्या तर त्याचा फटका प्रवाशांना बसण्याची शक्यता आहे.

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात मोटरमनची सुमारे ३०० पदे रिक्त आहेत. मोटरमनच्या सीएमएमटी, कल्याण आणि पनवेल येथील रनिंग स्टाफमध्ये अनुक्रमे १५० ते १६०, ९० ते १०० आणि ३५ ते ४० पदे रिक्त आहेत. त्यामुळे मोटरमनच्या एकूण पदांपैकी जवळपास ३० टक्के पदे रिक्त आहेत. त्यामुळे कार्यरत मोटरमनवर कामाचा अतिरिक्त भार पडतो. मोटरमनला जादा कामाचे पैसे दिले जात असले तरीही वाढत्या कामाचा ताण आणि प्रशासकीय दबावामुळे ते त्रस्त आहेत, असे मत मोटरमनने व्यक्त केले.