मुंबई : राज्य सरकारने मुंब्रा लोकल दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली असून जखमींना ५० हजार रुपये ते २ लाख रुपयांपर्यंत मदत आणि उपचारांचा खर्च सरकार करणार आहे. मात्र सरकारने केवळ आर्थिक मदत करण्यापेक्षा मृत प्रवाशांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला रेल्वेमध्ये कायमस्वरूपी अनुकंपा तत्त्वावर नोकरी द्यावी, अशी मागणी खासदार अरविंद सावंत यांनी केली.
मध्य रेल्वेच्या मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान लोकलमधून पडून मृत्यू झालेल्या प्रवाशांच्या कुटुंबातील व्यक्तीला रेल्वेत नोकरी द्यावी, अशी मागणी शिवसेनेने (ठाकरे) केली आहे. मध्य रेल्वेवरील प्रवाशांच्या समस्यांबाबत अरविंद सावंत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शुक्रवारी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धरमवीर मीना यांच्याकडे निवेदनाद्वारे विविध मागण्या केल्या.
दुर्घटनेनंतर सामान्य लोकलला स्वयंचलित दरवाजे बसविण्याचा निर्णय रेल्वे मंडळाने जाहीर केला. मात्र हा पर्याय व्यवहार्य नसल्याचे सावंत यांनी महाव्यवस्थापकांच्या निदर्शनास आणून दिले. स्वयंचलित दरवाजे प्रणालीमुळे गैरसोय होईल आणि अनेक प्रवाशांना इच्छित लोकल पकडता येणार नाही. ते प्रवासी कार्यालयात वेळेवर पोहोचू शकणार नाहीत. याचा विचार करून मध्य रेल्वेवर इतर प्रवासी सुविधा वेळीच उपलब्ध करा, अशी मागणी शिष्टमंडळाने केली.
रेल्वे मंत्रालयाने बुलेट ट्रेन आणि रेल्वे स्थानकांच्या सुशोभीकरणावर पैसे खर्च करण्याऐवजी लोकलची सेवा कशा पद्धतीने चांगली होईल याकडे लक्ष द्यावे, असे निवेदनात म्हटले आहे. या शिष्टमंडळात अरविंद सावंत यांच्यासोबत रेल कामगार सेनेचे सरचिटणीस दिवाकर देव, शाखाप्रमुख जयवंत नाईक आदी सहभागी होते. यावेळी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
प्रशासनाकडे या केल्या मागण्या
– दिवा – सीएसएमटी लोकल तातडीने सुरू करा.
– कल्याण आणि दिवा – सीएसएमटी लोकलची संख्या वाढवा.
– कल्याण – ठाणे शटल सेवा तत्काळ सुरू करा.
– ठाणे – पनवेल किंवा नवी मुंबई परिसर आणि कल्याण – ठाणे शटल सेवेला जोडणारी शटल सेवा सुरू करा.
– या मार्गांवर समांतरपणे एलिव्हेटेड किंवा खालून लोकल ट्रेन सेवा सुरू करण्याच्या प्रकल्पाचा विचार करा.