मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार मुंबईस्थित कोकणवासीयांच्या भावना लक्षात घेऊन यावर्षी गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या एकेरी गट आरक्षणावरील ३० टक्के भाडेवाढ मागे घेण्यात येत असल्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली. तर, एकेरी गट आरक्षणावरील ३० टक्के भाडेवाढ रद्द केल्याने, एसटीला १३ ते १६ कोटी रुपये तोटा सहन करावा लागण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) गेली ७७ वर्षापेक्षा जास्त काळ राज्यातील सर्वसामान्य जनतेला सुरक्षित आणि किफायतशीर प्रवासी सेवा देत आहे. सर्वसामान्य जनतेला फायदा -तोट्याचा विचार न करता दैनंदिन प्रवासाबरोबरच सण, यात्रा, उत्सव, लग्नकार्य यासाठी एसटी वेळेवर उपलब्ध करून दिली जाते.
विशेषतः गणेशोत्सव, आषाढी यात्रा, होळी निमित्त प्रवाशांच्या मागणीनुसार गट आरक्षणासाठी मोठ्या प्रमाणात बस उपलब्ध करण्यात येतात. यावर्षीही मुंबई शहर, उपनगरे आणि संपूर्ण महानगरातील प्रवाशांच्या मागणीनुसार तब्बल पाच हजार जादा एसटी बस गणेशोत्सवासाठी सोडण्याचे नियोजन एसटीने केले आहे, असे प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
एसटीला आर्थिक फटका
राज्य सरकारने लागू केलेल्या अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी असलेल्या सर्व सवलती गट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांसाठी उपलब्ध आहेत. मात्र प्रवासी केवळ एकेरी आरक्षण करीत असल्यामुळे परतीच्या प्रवासात एसटी बस मोकळ्या आणाव्या लागतात. त्याचा प्रचंड मोठा आर्थिक फटका एसटीला बसतो. सण, उत्सवासाठी राज्यभरातील इतर ठिकाणांहून बस एकत्रित करून प्रवाशांना उपलब्ध करून दिलेल्या असतात. त्यामुळे स्थानिक पातळीवर बसची कमतरता निर्माण होते. हे लक्षात घेता तोटा आणखी वाढू शकतो.
त्यामुळे तोटा काही प्रमाणात कमी करण्यासाठी एकेरी गट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांच्या तिकिटावर ३० टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय महामंडळाने नाईलाजाने घेतला होता. परंतु, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुचनेनुसार तसेच मुंबई व उपनगरातील प्रवाशांच्या भावना लक्षात घेता यंदा एकेरी गट आरक्षणावरील ३० भाडेवाढ रद्द करण्यात आली आहे.
मागील वर्षी ११.६८ कोटी रुपये नुकसान
मागील वर्षी एसटी महामंडळाने गणेशोत्सवासाठी जाताना ४,३३० बस व परतीच्या प्रवासासाठी १,१०४ बस उपलब्ध करून दिल्या होत्या. तथापि, एकेरी गट आरक्षणामुळे गणेशोत्सव काळात प्रवाशांना कोकणात त्यांच्या इच्छितस्थळी पोहचवून रिकाम्या बस परत आणाव्या लागल्या. तसेच त्यांना परतीच्या प्रवासासाठी देखील बस उपलब्ध करून देताना रिकाम्या बस राज्याच्या विविध भागातून कोकणात पाठवाव्या लागल्या. त्यामुळे इंधन खर्च, चालक वाहकांचे वेतन, अतिकालीन भत्ता याचा प्रचंड मोठा आर्थिक बोजा एसटीवर पडतो.
यातून गणेशोत्सव काळात मंडळाला तब्बल ११ कोटी ६८ लाख रुपये तोटा सहन करावा लागला. यंदा ५ हजार बसगाड्या सोडण्याचे नियोजन आहे. त्यामुळे या सर्व बस एकेरी गट आरक्षणासाठी आरक्षित झाल्यास हा तोटा १३ ते १६ कोटी रुपयांवर जाण्याची शक्यता आहे.