मुंबई : राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या बस मुंबई – पुणे महामार्गावरअतिवेगाने किंवा मार्ग बदलून मार्गक्रमण करणऱ्या बसवर दंडात्मक कारवाई केली जाते. जानेवारी ते एप्रिल या कालावधीत ३,३३१ वाहतुकीचे नियम मोडण्याच्या घटना घडल्या असून याद्वारे एसटी चालकांकडून १.३३ कोटी रुपयांची दंडवसुली केली आहे.

राज्याच्या मोटार परिवहन विभागाने मुंबई -पुणे महामार्गावरील वाहनांना शिस्त लावण्यासाठी इंटरसेप्टर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. वाहन अति वेगाने चालवल्यास त्या कॅमेऱ्यात वाहनाच्या क्रमांकाची नोंद होऊन त्या वाहनाच्या मालकाला इ-चलन पाठवले जाते. तसेच घाटात ताशी ४० किमी आणि रस्त्यावर ताशी ८० किमी कमाल वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

अवजड वाहने रस्त्याच्या डाव्या बाजूच्या मार्गिकेतून चालविणे बंधनकारक आहे. एसटी बस अवजड वाहनांच्या कक्षेत येत असल्याने, एसटी बसने दुसऱ्या अथवा पहिल्या मार्गावरून प्रवास केल्यास नियम मोडला जातो. त्यामुळे एसटीचे ई-चलन काढले जाते.

मुंबई – पुणे महामार्गावर जानेवारी ते एप्रिल २०२५ या कालावधीत एसटीच्या मुंबई विभागातील ७३१ ई-चलन काढले. त्यातून २२ लाखांची दंडवसुली करण्यात आली. त्यात ४९० अतिवेगाने वाहने चालविण्याची प्रकरणे घडली. लेन कटिंगची ८४ प्रकरणे घडली. याद्वारे अनुक्रमे १९.६० लाख रुपये आणि २.४१ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

नियमानुसार हा दंड संबंधित वाहनाच्या मालकाला केला जातो. परंतु एस टी महामंडळाचे अधिकारी हा दंड स्वतः न भरता सर्वसामान्य चालकाच्या पगारातून वसूल करतात. मुळातच अत्यंत कमी पगार असणाऱ्या चालकाला महिन्यातून तीन-चार वेळा अशा प्रकारे दंड वसूल केल्यामुळे अतिशय तुटपुंजा पगार हातात येतो.

विशेष म्हणजे या नवीन नियमाची कोणतीही पूर्वकल्पना संबंधित चालकांना महामंडळाने दिलेली नाही. केवळ परिपत्रके काढून संबंधित अधिकारी जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करतात. त्यामध्ये बेजबाबदारपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या वर कारवाई व्हावी आणि हा संपूर्ण दंड महामंडळाने भरावा, असे महाराष्ट्र एसटी कर्मचारी कॉंग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वेगमर्यादा ओलंडणे – ४ हजार रुपये दंड
लेन कटिंग – एक हजार रुपये दंड
सिग्नल मोडल्यास – ५०० रुपये दंड
गर्दीच्या ठिकाणी वाहन थांबविणे – १ हजार ते १,५०० रुपये दंड
थांब्याशिवाय इतर ठिकाणी वाहन थांबविणे – १ हजार ते १,५०० रुपये दंड