मुंबई : राज्यातील काही भागात पुन्हा पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. दरम्यान, पुढील दोन – तीन दिवस मुंबईसह राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या कालावधीत मेघगर्जना होण्याचीही शक्यता आहे.

गेले दोन दिवस राज्यात पावसाने विश्रांती घेतली होती. त्यानंतर गुरुवारी पुन्हा काही भागात मुसळधार पाऊस कोसळला. मुंबईतील पश्चिम उपनगरांत शुक्रवारी हलक्या सरी बरसल्या. अंधेरी, बोरिवली, वांद्रे परिसरात पावसाचा शिडकावा झाला. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात शुक्रवारी सकाळी ८:३० ते सायंकाळी ५:३० पर्यंत १० मिमी, तर सांताक्रूझ केंद्रात २ मिमी पावसाची नोंद झाली.

दरम्यान, पुढील दोन दिवस मुंबईसह राज्याच्या इतर भागात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या कालावधीत काही ठिकाणी मेघगर्जना होईल अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, महाराष्ट्रावर, तसेच उत्तर कर्नाटकावर चक्रिय स्थिती निर्माण झाली आहे. याचाच परिणाम म्हणून पुढील दोन – तीन दिवस राज्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. याचबरोबर येत्या आठवड्यात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे.

पावसाचा अंदाज कुठे

हलक्या ते मध्यम सरी

  • मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग

मेघगर्जनेसह पाऊस

  • धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, लातूर, धाराशिव

वर्धा येथे सर्वाधिक तापमान

वर्धा येथे शुक्रवारी सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. तेथे ३५.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. त्याखालोखाल अकोला ३४.२ अंश सेल्सिअस, ब्रह्मपुरी ३५.१ अंश सेल्सिअस, नागपूर ३३.४ अंश सेल्सिअस आणि चंद्रपूर येथे ३४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.