मुंबई : वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याचा फसवा संदेश पाठवून फसवणूक करण्याचा नवीन प्रकार सध्या सुरू आहे. वर्सोवा येथील एका व्यक्तीला सिग्नल तोडल्याचा संदेश पाठवून दंड भरण्यासाठी ‘एपीके’ फाईल पाठवण्यात आली होती. ही फाईल डाऊनलोड करतात त्यांचा मोबाइल हॅक करून बॅंक खात्यातील ९५ हजार रुपये लंपास करण्यात आले. या प्रकरणी वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंधेरी (पश्चिम) परिसरातील वर्सोवा रोड येथे वास्तव्यास असलेले मुख्तार शेख (६०) यांना २५ जून रोजी एक व्हॉट्स ॲप क्रमांकावरून संदेश आला. ‘तुम्ही सिग्नल तोडला असून त्यासाठी १ हजार रुपये दंड भरावा लागेल. दंड भरण्यासाठी खालील एपीके फाईल डाऊनलोड करा’ असे या संदेशात म्हटले होते.

या संदेशात शेख यांच्या दुचाकीचा क्रमांक नमुद होता आणि एक एपीके फाईल होती. त्यामुळे त्यांना तो मेसेज खरा वाटला. त्यांनी ती एपीके फाईल डाऊनलोड केली. त्यानंतर सायबर भामट्याने शेख यांना त्यांचा मोबाइल क्रमांक त्या एपीके फाईलमध्ये टाकण्यास सांगितले. सदर व्यक्तीने आपल्या मोबाइलवर संदेश पाठवला असला तरी तो आपला मोबाइल क्रमांक विचारत असल्याबद्दल शेख यांना शंका आली. त्यामुळे त्यांनी तात्काळ तो क्रमांक ब्लॉक केला.

दरम्यान, एक तासांना शेख यांना बॅंकेचा संदेश आला. बॅंकेच्या व्यवहारासाठी त्यांच्या आधार कार्ड क्रमांकाचा वापर करण्यात आल्याचे त्यात नमूद होते. शेख यांनी तात्काळ सात बंगला येथील पंजाब नॅशनल बॅंकेशी संपर्क साधला. तोपर्यंत सायबर भामट्याने त्यांच्या बॅंक खात्यातून ४९ हजार ५५ आणि ४६ हजार ३७६ रुपये काढले होते. अवघ्या दीड तासात सायबऱ भामट्याने त्यांच्या बॅंक खात्यातून ९५ हजार ९३१ रुपये लंपास करण्यात आले.

या फसवणुकीबाबत त्यांनी वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या तक्रारीवरून अनोळखी व्यक्तीविरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलम ६६ (क), ६६ (ड), तसचे फसवणुकीच्या कलम ३१८ (४) अन्वये गुन्हा दाखल केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एपीके फाईल म्हणजे वायरस

वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याचे फसवे संदेश पाठवून सध्या फसवणूक करण्यात येत आहे, अशी माहिती सायबरतज्ञ डॉ. शेखर पवार यांनी दिली. तुम्ही वाहतूक नियमांचे उल्लंघन केले असून दंड भरण्यासाठी एपीके फाईल डाऊनलोड करा, असे संदेशात नमुद करण्यात येते. नागरिकांना तो संदेश खरा वाटतो आणि ते एपीके फाईल डाऊनलोड करतात. मात्र एपीके फाईल एक व्हायरस आहे. तो ॲण्ड्रॉईड मोबाइलसाठी घातक असतो. ही फाईल डाऊनलोड होताच मालवेअर इन्स्टॉल होतो आणि सायबर भामट्यांना तुमच्या मोबाइलचा पूर्ण ताबा घेता येतो. त्यानंतर मोबाइलमधील माहिती, छायाचित्रांचा गैरवापर केला जातो. बॅंकेचे तपशील त्यांना मिळतात, त्यातून आर्थिक फसवणूक होते. त्यामुळे एपीके फाईल डाऊनलोड करू नका, असे आवाहन डॉ पवार यांनी केले आहे.