मुंबई : नायर रुग्णालयामध्ये रोजंदारीवर कार्यरत असलेल्या ७४ कर्मचाऱ्यांना ऑक्टोबरपासून वेतनच देण्यात आलेले नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले असून, त्यांची परिस्थिती बिकट झाली आहे. तीन महिने वेतन न मिळाल्याने घरखर्च कसा भागवायचा, मुलांच्या शाळांचे शुल्क, आई – वडिलांच्या औषधांचा खर्च कसा करायचा असा प्रश्न त्यांच्यासमाेर निर्माण झाला आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयामध्ये २००९-२०१० पासून किमान वेतनावर ७४ कर्मचारी रोजंदारी कामगार म्हणून काम करीत आहेत. मात्र ऑक्टोबरपासून सलग तीन महिने या कर्मचाऱ्यांना वेतन मिळालेले नाही. यासदर्भात कर्मचाऱ्यांनी वारंवार प्रशासनाकडे वेतनसाठी पाठपुरावा करूनही त्यांना समाधानकारक उत्तर मिळत नव्हते. अखेर म्युनिसिपल मजदूर युनियने यासंदर्भात नायर रुग्णालयातील प्रशासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता ७४ रोजंदारी कामगारांची मुळ नस्ती तत्कालीन वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालयाचे संचालक यांचे कार्यालय असलेल्या केईएम रुग्णालयातून गहाळ झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे उप आयुक्त, अतिरिक्त आयुक्त व महानगरपालिका आयुक्त यांची मंजुरी घेण्यास विलंब होत आहे. परिणामी, या कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात अडचणी येत असल्याचे नायर रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.

हेही वाचा – एमआयडीसीचे भूखंड म्हाडाकडून विकसित ? संयुक्त भागीदारी तत्त्वाबाबत लवकरच करार

कामगारांची कोणतीही चूक नसताना व काम करूनही त्यांना तीन महिने वेतन न मिळाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. वेतन न मिळाल्याने घरखर्च कसा चालवायचा, मुलांच्या शाळांचे शुल्क कसे भरायचे, आई वडिलांच्या औषधांचा खर्च कसा करायचा असा प्रश्न त्यांच्यासमाेर निर्माण झाला आहे. त्यामुळे या ७४ रोजंदारी कामगारांना ऑक्टोबर ते डिसेंबर २०२४ या तीन महिन्यांचे वेतन तातडीने देण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात यावे, अशी मागणी म्युनिसिपल मजदूर युनियनचे सह सरचिटणीस प्रदीप नारकर यांनी नायर रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांकडे केली आहे.

दिवाळीचा बोनसही मिळाला नाही

तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार महानगरपालिका आयुक्तांनी या कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त पाच हजार रुपये बोनस जाहीर केला. मात्र या कर्मचाऱ्यांना अद्यापही बोनसची रक्कम मिळालेली नाही. आता सलग तीन महिने वेतन न मिळाल्याने या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळी आली आहे, असे प्रदीप नारकर यांनी सांगितले.

हेही वाचा – सैफवर हल्ला प्रकरण : आरोपी शरिफुलचा बांगलादेशातील चालक परवाना पोलिसांच्या हाती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर वेतन देण्याचे प्रयत्न रुग्णालय प्रशासनाकडून सुरू आहेत. त्यांना लवकरच वेतन देण्यात येईल. – डॉ. शैलेश मोहिते, अधिष्ठाता, नायर रुग्णालय