मुंबई : बिटकॉईन घोटाळ्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) मुंबई विभागाने सोमवारी मेसर्स व्हेरिअबल टेक प्रा. लिचे अमित भारद्वाज यांच्या मालकीच्या १०.६३ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता तात्पुरत्या स्वरूपात जप्त केल्या आहेत. यात दुबई येथील प्रमुख व्यावसायिक केंद्रांमध्ये असलेल्या व्यावसायिक मालमत्तांचा समावेश आहे.

महाराष्ट्र आणि दिल्ली पोलिसांनी मेसर्स व्हेरिअबल टेक प्रा. लि.ते अमित भारद्वाज, अजय भारद्वाज, विवेक भारद्वाज, सिम्पी भारद्वाज, महेंद्र भारद्वाज आणि एमएलएमचे एजंट्सविरुद्ध नोंदवलेल्या विविध गुन्ह्यांच्या आधारे ईडीने यातील आर्थिक गैरव्यवहारांची चौकशी सुरू केली होती. त्याचाच भाग म्हणून ईडीतर्फे सोमवारी उपरोक्त कारवाई करण्यात आली. दरमहा दहा टक्के परतावा देण्याच्या खोट्या आश्वासनांसह बिटकॉइनच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणात निधी गोळा केल्याचा आरोप आरोपींवर आहे. हा निधी खाणींच्या कामासाठी वापरण्यात येणार होता आणि गुंतवणूकदारांना क्रिप्टो मालमत्तेत मोठ्या प्रमाणात परतावा मिळणार होता. परंतु प्रवर्तकांनी गुंतवणूकदारांची फसवणूक केली आणि बेकायदेशीररित्या मिळवलेले बिटकॉइन अस्पष्ट ऑनलाइन वॉलेटमध्ये लपवून ठेवले आहेत, असाही ईडीचा आरोप आहे. या प्रकरणी सिम्पी भारद्वाज, नितीन गौर आणि निखिल महाजन या तीनजणांना अटक करण्यात आली आहे. तर, मुख्य आरोपी अजय भारद्वाज आणि महेंद्र भारद्वाज अजूनही फरारी आहेत. यापूर्वी, ईडीने १७२ कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त केल्या होत्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रतिभा इंडस्ट्रीजच्या २४ कोटींची स्थावर मालमत्तेवरही टाच

बँक ऑफ बडोदाच्या कर्ज घोटाळ्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी ईडीच्या मुंबई विभागाने मेसर्स प्रतिभा इंडस्ट्रीज लिमिटेडच्या अजित कुलकर्णी आणि इतर आरोपींच्या २४.५२ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता तात्पुरत्या स्वरूपात टाच आणली. आरोपींनी ४९५७ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बँकेने तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेऊन सीबीआयने मेसर्स प्रतिभा इंडस्ट्रीज लिमिटेड, अजित कुलकर्णी आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याच्या आधारे ईडीने आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी सुरू केली होती. आरोपींनी आर्थिक नोंदींमध्ये फेरफार करून फसव्या व्यवहारांद्वारे कर्ज निधी वळवून बँकेचे नुकसान करण्यासाठी आणि स्वतःला फायदा करून घेण्यासाठी हा कट रचल्याचा ईडीचा आरोप आरोप आहे. यापूर्वी मुंबई आणि दिल्लीतील १४ वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकण्यात आले आणि बँक खात्यांसह ५.४ कोटी रुपयांचे म्युच्युअल फंड खाते गोठवण्यात आले. तसेच, स्थावर मालमत्तेच्या खरेदीशी संबंधित पुरावे जप्त करण्यात आले होते.