मुंबई : दिवाळी, छठपूजेनिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन नियमित रेल्वेगाड्यांसोबतच विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात आल्या आहेत. परंतु, या रेल्वेगाड्यांमधून जाणाऱ्या प्रवाशांना स्थानकापर्यंत सोडण्यासाठी येणारे कुटुंबीय, नातेवाईकांची रेल्वे स्थानकात गर्दी होते. त्यामुळे गर्दी नियंत्रित करणे सुरक्षा व्यवस्थेला कठीण जाते. हा प्रकार रोखण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाने रेल्वे स्थानकात फलाट तिकीट विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

दिवाळी आणि छठपूजेनिमित्त मुंबईतून देशाच्या विविध भागात मोठ्या संख्येने प्रवासी जातात. विशेषत: उत्तर भारतात जाणाऱ्यांची संख्या प्रचंड मोठी आहे. त्यामुळे या मार्गावरून अतिरिक्त विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून विशेष रेल्वेगाड्या धावत आहेत. त्यामुळे पुढील काही दिवस नियमित रेल्वे प्रवाशांसह बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची वर्दळ रेल्वे स्थानकात वाढणार आहे.

एकाच वेळी गर्दीचा लोंढा वाढून चेंगराचेंगरी होण्याची शक्यता नाकरता येत नाही. अशा अनुचित घटना टाळण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या प्रमुख रेल्वे स्थानकांत गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जादा सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. रेल्वे स्थानकातील प्रत्येक ठिकाणी सीसी टीव्ही कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे.

तसेच मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी), ठाणे, कल्याण, पनवेल या स्थानकांत १६ ते २६ ऑक्टोबर या कालावधीत फलाट तिकीट मिळणार नाही, असे मध्य रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे. वयोवृद्ध, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण, लहान मुले यांचा प्रवास सोयीस्कर होण्यासाठी त्यांना फलाट विक्री निर्बंधांमधून सूट दिली आहे. त्यांच्यासोबत असणाऱ्या एका व्यक्तीला फलाट तिकीट दिले जाईल, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली.

पश्चिम रे्लवेवरील वांद्रे टर्मिनस, वापी, उधना, सूरत या रेल्वे स्थानकांवर १५ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान फलाट तिकीट विक्री होणार नाही.

छठपूजेदरम्यान ऑक्टोबर २०२४ मध्ये पश्चिम रेल्वेवरील वांद्रे टर्मिनस येथे रेल्वेगाडीत चढताना प्रवाशांमध्ये धक्काबुक्की झाली. त्यांचे रुपांतर चेंगराचेंगरीत होऊन अनेक प्रवासी दगावले. तर, महाकुंभ मेळाव्यानिमित्त फेब्रुवारी २०२५ मध्ये नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी होऊन अनेकांचा मृत्यू झाला होता.

प्रवाशांचा प्रवास सुरळीत व्हावा यासाठी फलाट तिकीट विक्री बंद करण्यात आली आहे. प्रवाशांनी त्यांच्या प्रवासाचे नियोजन करावे. सणांच्या काळात सुरक्षित आणि सुव्यवस्थित प्रवास होण्यासाठी घालण्यात आलेल्या तात्पुरत्या निर्बंधांचे पालन करून रेल्वे कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे. रेल्वेगाडी सुटण्याच्या वेळेच्या खूप आधी आलेल्या प्रवाशांना विश्रांती कक्षाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पश्चिम रेल्वे सज्ज आहे. – विनीत अभिषेक, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे