मुंबई : मुंबईतील बहुतांशी सर्व सार्वजनिक व घरगुती गणेशमूर्तींचे अनंत चतुर्दशीच्या दिवशी शनिवार, ६ सप्टेंबर रोजी विसर्जन होणार आहे. मुंबई महापालिकेने तब्बल दोन महिने विसर्जन सोहळ्याची तयारी केली असून शनिवारी विसर्जनाच्या दिवशी मुंबई महापालिकेच्या या तयारीची कसोटीच लागणार आहे. यंदा प्रथमच सहा फुटाखालील सर्वच मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन केले जाणार आहे. त्यामुळे पालिकेची यंत्रणा किती टिकते हे समजू शकणार आहे.
न्यायालयाच्या आदेशानुसार यंदा सहा फुटापर्यंतच्या पीओपीच्या मूर्तींचे कृत्रिम तलावात व त्यापेक्षा उंच मूर्तींचे विसर्जन नैसर्गिक जलस्रोतात करण्यात येणार आहे. त्याची रंगीत तालीमच दीड, पाच आणि सात दिवसांच्या गणेश विसर्जनाच्या वेळी पार पडली. मात्र अनेक ठिकाणी गोंधळाची स्थिती होती. वादावादी, भांडणे, गोंधळात यंदा दीड, पाच व सात दिवसांच्या गणपतीचे विसर्जन पार पडले. मात्र अनंत चतुर्दशीच्या दिवशी मोठ्या संख्येने गणेशमूर्ती विसर्जनासाठी येत असतात. त्यातही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मुर्तींची संख्या मोठी असते. त्यामुळे या नव्या नियमाची अंमलबजावणी करण्यात पालिकेला किती यश येते ते शनिवारी समजू शकणार आहे.
सार्वजनिक मंडळांच्या लहान मूर्तींचे काय होणार ?
मुंबईत सुमारे १२ हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे असून त्यापैकी बहुतांशी मंडळे ही लहान सोसायट्यांमधील, वसाहतींमधील आहेत. या मंडळांच्या मूर्ती सहा फुटांच्या आतील असतात. मात्र यापैकी बहुतांशी मंडळांच्या मूर्ती शाडूच्या मातीच्या आहेत. या मूर्ती समुद्रात विसर्जन करण्याची परंपरा आहे. परंतु, या मूर्ती नियमानुसार कृत्रिम तलावात विसर्जित कराव्या लागणार आहेत. मंडळे त्यास तयार होण्याची शक्यता कमी आहे. तसेच मंडळांच्या मूर्ती कृत्रिम तलावात विसर्जित केल्यास कृत्रिम तलावाच्या ठिकाणी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्याचा दिवस हा पालिका आणि पोलीस यांच्यासाठी मोठा कसोटीचा असेल. मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन मुंबई महापालिका प्रशासनाने नागरिक व मंडळांना केले आहे.
दहा हजार अधिकारी आणि २४५ नियंत्रण कक्ष
शनिवारी होणाऱ्या गणेश विसर्जनासाठी ७० नैसर्गिक स्थळे व सुमारे २९० कृत्रिम तलाव उपलब्ध करण्यात आले आहेत. १० हजार अधिकारी – कर्मचारी, २४५ नियंत्रण कक्ष कार्यरत असतील. तसेच निर्माल्य कलश, नियंत्रण कक्ष, निरीक्षण मनोरे, विद्युत व्यवस्था, रुग्णवाहिका इ. सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
अन्य सुविधा
- चौपाट्यांवर वाहने अडकू नयेत म्हणून १,१७५ स्टील प्लेट
- छोट्या मूर्ती विसर्जनासाठी – ६६ जर्मन तराफे
- २,१७८ जीवरक्षक, ५६ मोटरबोटी तैनात
- ५९४ निर्माल्य कलश आणि ३०७ निर्माल्य वाहने
नियंत्रण आणि समन्वय
विभागीय समन्वयासाठी – २४५ नियंत्रण कक्ष
सुरक्षा देखरेखीसाठी – १२९ निरीक्षण मनोरे
विसर्जन स्थळी – ४२ क्रेन, २८७ स्वागत कक्ष
आरोग्य व प्रकाश व्यवस्था
- २३६ प्रथमोपचार केंद्र व ११५ रुग्णवाहिका.
- रात्रीच्या विसर्जनासाठी – ६,१८८ फ्लडलाईट्स व १३८ सर्चलाईट्स
१९७ तात्पुरती शौचालयं उपलब्ध
आपत्कालीन तयारीसाठी – अग्निशमन दलाचे वाहन व कर्मचारी
कृत्रिम तलावांची माहिती
२९० कृत्रिम तलावांची यादी www.mcgm.gov.in संकेतस्थळावर. यामध्ये गुगल मॅप लिंकसह उपलब्ध.
QR कोड स्कॅन किंवा BMC WhatsApp Chatbot : ८९९९२२८९९९ वरून माहिती.
नागरिकांना सूचना व आवाहन
- विसर्जनस्थळी पावित्र्य व शिस्त राखावी.
- मुंबई महानगरपालिका व मुंबई पोलिसांच्या सूचना पाळाव्यात.
- गर्दीत सतर्क राहावे, जबाबदारीने वागावे.
मत्स्यदंश व सागरी सुरक्षितता
- ऑगस्ट-ऑक्टोबरमध्ये ‘ब्लू बटन जेलीफिश’, ‘स्टिंग रेपासून सावध रहावे.
- मत्स्यदंश झाल्यास वैद्यकीय कक्ष व १०८ रुग्णवाहिका उपलब्ध.
भरती-ओहोटीची वेळ
६ सप्टेंबर सकाळी ११.०९ – ४.२० मीटर भरती
सायंकाळी ५.१३ – १.४१ मीटर ओहोटी
रात्री ११.१७ – ३.८७ मीटर भरती
७ सप्टेंबर पहाटे ५.०६ – ०.६९ मीटर ओहोटी
सकाळी ११.४० – ४.४२ मीटर भरती