मुंबई : मुंबईत शुक्रवारी मध्यरात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे शनिवारी मुंबईकरांची त्रेधा उडाली. मुसळधार पावसामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरांतील अनेक सखलभाग जलमय झाल्याने त्याचा वाहतुकीवर परिणाम झाला. झोपडपट्ट्या, चाळींमध्ये पाणी साचल्यामुळे रहिवाशांचे अतोनात हाल झाले.

दरम्यान, मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेची आपत्कालीन पथके, कामगार, अभियंते, पंप ऑपरेटर ठिकठाकाणी तैनात होते. मात्र सखलभागात साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले. दरम्यान, विक्रोळीमधील पार्कसाईट परिसरात शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास एका घरावर डोंगराचा काही भाग कोसळला. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील पिता आणि मुलीचा मृत्यू झाला. तर आई, मुलगा आणि शेजारी राहणारे अन्य दोघेजण जखमी झाले असून जखमींवर घाटकोपराच्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुंबईत ऑगस्टच्या सुरुवातीपासून पावसाने दडी मारली होती. त्यांनतर, मुंबईत शुक्रवारी मध्यरात्रीपासून पावसाने दमदार हजेरी लावली. पावसाचा जोर शनिवारीही कायम होता. दरम्यान, हवामान खात्याने मुंबईत अतिमुसळधार (रेड अलर्ट) पावसाचा इशारा दिल्याने महानगरपालिकेने सर्व यंत्रणा तैनात केल्या होत्या. मुसळधार पावसामुळे शहर आणि उपनगरातील अनेक सखलभाग जलमय झाले. विविध ठिकाणी झालेल्या वाहतूक कोंडीमुळे मुंबईकरांना प्रचंड हाल झाले. मुसळधार पावसामुळे शनिवारी जोगेश्वरी, चुनाभट्टीतील एव्हरर्ड नगर, गुलमोहर लेन, माटुंगा येथील गांधी मार्केट परिसर जलमय झाला. तसेच, अँटॉप हिल येथील एमजीआर चौक व काणे नगर बसस्थानक येथे सुमारे एक ते दीड फूट पाणी साचले होते. त्यामुळे तेथील वाहतूक संथ गतीने सुरू केली. प्रतीक्षा नगरात साचलेल्या पाण्याचा वेळेत निचरा होऊ शकला नाही. तेथे साधारण ३ ते ४ तास पाणी साचले होते.

आरे मेट्रो कारशेडजवळील मेट्रो पुलाखालीही २.५ ते ३ फूट पाणी साचले होते. परिणामी, आरे पिकनिक पॉईंटकडून मरोळकडे जाणारी व मरोळकडून आरे पिकनिक पॉईंटकडे येणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती. त्यामुळे प्रवशांची प्रचंड गैरसोय झाली. एस. व्ही. मार्ग, जुहू तारा मार्ग, तसेच घाटकोपर येथील ९० फूट मार्गावरही पाणी साचले होते. सखलभागांमध्ये पाणी साचल्यामुळे वाहतूक अन्य मार्गाने वळवावी लागली होती.

ठाकूर कॉम्प्लेक्स येथील ९० फूट मार्ग आणि पूर्व द्रुतगती मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. माझगावमधील सेंट मेरी शाळेसमोरील रस्त्यावरही पाणी साचले होते. तसेच, वडाळा, कुर्ला, टिळक नगर, दहिसर, जोगेश्वरी, साकीनाका आदी ठिकाणचा सखलभाग जलमय झाला होता. मानखुर्द टी जंक्शन येथील महाराष्ट्र नगरात ये – जा करण्यासाठी बांधण्यात आलेल्या बोगद्यांमध्ये पाणी साचल्याने तो बंद करण्यात आला होता. परिणामी, नागरिकांना रेल्वे रुळांवरील पुलावरून प्रवास करावा लागला. मुसळधार पाऊस कोसळताच हा बोगदा जलमय होतो.

विक्रोळीत दरड कोसळून दोघांचा मृत्यू, चार जखमी

मुंबई शहर आणि उपनगरात शुक्रवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत होता. विक्रोळीमधील पार्कसाईट येथील वर्षा नगर विभागातील जनकल्याण सोसायटीमधील मिश्रा कुटुंबाच्या घरावर शुक्रवारी मध्यरात्री २ च्या सुमारास अचानक डोंगराचाच्या मोठा भाग कोसळला. मिश्रा कुटुंबीय गाढ झोपेत असताना ही घटना घडली. शेजाऱ्यांनी तत्काळ दुर्घटनेची माहिती महापालिका आणि अग्निशमन दलाला दिली. अग्निशमन दलाचे जवान आणि महापालिका कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य हाती घेतले.

डोंगरावरून मोठ्या प्रमाणात माती घरावर कोसळली असून तातडीने हा ढिगारा उपसण्याचे काम हाती घेण्यात आले. मातीच्या ढिगाऱ्याखालून सुरेशचंद्र मिश्रा, आरती मिश्रा, ऋतुराज मिश्रा आणि शालू मिश्रा या चौघांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच सुरेशचंद्र मिश्रा आणि शालू मिश्रा या बाप – लेकीचा मृत्यू झाला. तर आरती आणि ऋतुराज गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पार्कसाइट भागातील डोंगरावर वर्षा नगर वस्ती असून या ठिकाणी वारंवार आशा घटना घडत असल्याने नगरिकामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच सुरक्षिततेच्या उपाययोजना म्हणून आजूबाजूची घरे रिकामी करण्यात आली आहेत