मुंबई : मुंबई महानगरात सोमवारी सायंकाळपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर मंगळवारी वाढला. मुंबई शहर आणि उपनगरांत मंगळवारी सकाळपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे कार्यालयात निघालेल्यांची तारांबळ उडाली. पावसामुळे दृश्यमानता कमी झाल्याने लोकलचा वेग मंदावला होता. मध्य रेल्वेवरील लोकल वेळापत्रकाच्या नियोजित वेळेच्या तुलनेत तब्बल ३० ते ४० मिनिटे, तर, काही लोकल तब्बल ५० मिनिटे विलंबाने धावत होत्या. त्यामुळे प्रवाशांना कार्यालयात पोहोचण्यासाठी प्रचंड विलंब झाला.
हवामान विभागाने सकाळी मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा दिला. तसेच दुपारनंतर सतर्कतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला. त्यामुळे मुंबईतील काही भागात रिमझिम, तर काही भागात मुसळधार पाऊस पडत होता. पूर्व आणि पश्चिम उपनगरात पावसाचा जोर वाढल्याने लोकल सेवा संथगतीने मार्गस्थ होत होत्या. त्यामुळे सकाळी उपनगरांतून निघालेल्या प्रवाशांना मुंबईत पोहोचण्यासाठी प्रचंड उशीर झाला. ठाणे, मुलुंड, विक्रोळी, घाटकोपर, दादर, अंधेरी, कांदिवली, बोरिवली या भागात पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. त्यामुळे लोकल सेवा कोलमडली.
पश्चिम रेल्वेवरील लोकल सेवा १० ते १५ मिनिटे उशिराने धावत होती. तर, मध्य रेल्वेवरील विविध मार्गावरील लोकल अवेळी धावत होत्या. तर, काही धीम्या लोकल जलद म्हणून घोषित करण्यात आल्या. मात्र, या लोकलही कूर्मगतीने धावत होत्या. धीम्या लोकल जलद केल्याने, ठाकुर्ली, कोपर, मुंब्रा, कळवा, भांडूप, नाहूर, कांजूरमार्ग, विक्रोळी, विद्याविहार, शीव, माटुंगा, परळ, करी रोड, चिंचपोकळी, मशीद, सँडहर्स्ट रोड या स्थानकांत लोकल थांबल्या नाहीत. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना त्यांची इच्छित लोकल पकडता आली नाही.
कसारा, आसनगाव, टिटवाळा, खोपोली, कर्जत, बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, ठाणे येथून मुंबई दिशेकडे जाणाऱ्या लोकल विलंबाने धावत होत्या. बदलापूरवरून सुटलेली एक लोकल सुमारे ५० मिनिटे उशिराने धावत होती. तसेच, इतर स्थानकातून सुटलेल्या लोकल ३० ते ४० मिनिटे विलंबाने धावत होत्या. हार्बर मार्गावरील पनवेल, वाशी, बेलापूर येथून सीएसएमटी दिशेकडे येणाऱ्या लोकल १० ते १५ मिनिटे उशिराने धावत होत्या. गोरेगाव – सीएसएमटी दरम्यानच्या लोकल सेवा काही मिनिटे विलंबाने धावत होत्या. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील काही भागात पायाभूत कामे, देखभाल-दुरूस्तीची कामे सुरू होती. त्याचाही लोकलला फटका बसला.