मुंबई : गेल्या अनेक कालावधीपासून मुंबई ते मडगाव ‘वंदे भारत’ आठ डब्याची चालवण्यात येत होती. या वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याने, ऐन गणेशोत्सव काळात वंदे भारत एक्सप्रेसच्या डब्यांची संख्या दुपटीने वाढवण्यात आली आहे. त्यामुळे कोकणात वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे.

जून २०२३ मध्ये कोकण रेल्वेवरील आणि गोवा राज्यातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस मडगाववरून धावण्यास सुरुवात झाली. त्यामुळे देशविदेशातील पर्यटकांना आरामदायी, वेगवान प्रवासाची अनुभूती मिळण्यास सुरुवात झाल्याने वंदे भारतला अधिक पसंती मिळू लागली. या वंदे भारत एक्सप्रेसचे तिकीट आरक्षण मर्यादेपेक्षा जास्त होऊन प्रतीक्षा यादी सुरू होते. प्रवाशांची मागणी अधिक असल्याने, या एक्सप्रेसला १६ किंवा २० डबे जोडण्याची मागणी केली जात होती.

गाडी क्रमांक २२२२९/२२२३० मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसने सुरुवातीपासून सुमारे ९५ टक्के प्रवासी क्षमता राखली आहे. त्यामुळे आठ डब्यांची वंदे भारत एक्सप्रेस सर्व प्रवाशांची मागणी पूर्ण करण्यात अयशस्वी ठरत होती. विशेषतः आठवड्याच्या शेवटी आणि सुट्टीच्या हंगामात बहुतांश प्रवाशांना वंदे भारतचा प्रवास करता येत नव्हता, परंतु अनेक पायाभूत बाबींमुळे डब्यांची संख्या वाढवण्यावर मर्यादा येत होत्या.

राज्यभरात वंदे भारत एक्सप्रेसची संख्या वाढते आहे. मुंबई आणि मराठवाड्याला वंदे भारतने जोडण्यावर भर दिला आहे. यात जालना-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस नांदेडपर्यंत वाढवण्याचा आणि मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसशी तिचे एकीकरण करण्याचा रेल्वे मंडळाने निर्णय घेतला आहे. त्यामुळे या रेकची प्राथमिक देखभाल आता नांदेडला हलवण्यात आली. त्यामुळे मुंबईतील पिट लाईन (देखभाल-दुरुस्ती मार्गिका) उपलब्ध झाली असल्याने मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसचा लांब रेक सामावून घेण्यासाठी जागा उपलब्ध झाली. त्यामुळे मुंबई-मडगाव वंदे भारत डबे दुप्पट करण्याची मागणी कोकण विकास समितीद्वारे करण्यात आली.

गणेश चतुर्थी उत्सवाच्या तीन दिवसांसाठी अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने २२२२९/२२२३० मुंबई- गोवा वंदे भारत एक्सप्रेस १६ डब्यांच्या सेवेत रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. तात्पुरत्या कालावधीसाठी १६ डब्यांची वंदे भारत एक्सप्रेस केल्याची माहिती मध्य रेल्वेतील सूत्रांनी दिली. १६ डब्यांची ही वंदे भारत एक्सप्रेस २५, २७ आणि २९ ऑगस्ट रोजी मुंबई सीएसएमटीहून आणि २६, २८ आणि ३० ऑगस्ट रोजी मडगावहून धावणार आहे.