मुंबई : मुंबई ते नांदेड प्रवासाचा खर्च करण्यात येणार असून मुंबई ते नांदेड दरम्यान चालवल्या जाणाऱ्या राज्यराणी एक्स्प्रेसच्या संरचने बदल करण्यात आला आहे. गाडीच्या चेअर कार डब्यात वाढ करण्यात आली आहे. शयनयान डबा कमी करून चेअर कार डबा वाढविण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास कमी तिकीट दरात होईल. राज्यराणी एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी हा बदल लाभदायी ठरेल.

राज्यराणी एक्स्प्रेस हजारो प्रवाशांसाठी महत्त्वाची

भारतीय रेल्वेच्या दक्षिण मध्य रेल्वे विभागातील नांदेड- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मार्गावर राज्य राणी एक्स्प्रेस धावते. नांदेड ते मुंबई असा ६१० किमीचा प्रवास १२.०७ तासांत ही एक्स्प्रेस पूर्ण करते. सध्या ही रेल्वेगाडी दररोज धावत असून हजारो प्रवाशांसाठी महत्त्वाची आहे. ही रेल्वेगाडी पूर्णा जंक्शन, परभणी जंक्शन, जालना, छत्रपती संभाजीनगर, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण आणि ठाणे यासह अनेक स्थानकांतून प्रवास करते. त्यामुळे मुंबई महानगरातील प्रवाशांना थेट नाशिक विभाग आणि मराठवाड्यात जाण्यासाठी उपयोगी रेल्वेगाडी आहे.

या रेल्वेगाडीला एलएचबी डबे जोडण्याची मागणी

राज्यराणी एक्स्प्रेस ही एकूण १७ डब्याची आहे. या रेल्वेगाडीला भारतीय रेल्वे मानक कोच (आयआरएस) डबे आहेत. परंतु, या रेल्वेगाडीला लिके हाॅफमॅन बुश (एलएचबी) डबे जोडण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे. एलएचबी डब्यांची बांधणी स्टीलने केली जाते. आतून ॲल्युमिनिअमचा वापर केला जातो. त्यामुळे रेल्वेगाडीचे वजन कमी झाल्याने एक्स्प्रेसचा वेगही वाढवण्यास मदत होते. एखाद्यावेळी अपघात झाल्यास जिवीतहानी कमी होण्याची शक्यता असते.

रेल्वेगाडीत काय बदल

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नांदेड राज्यराणी एक्स्प्रेस सुधारित संरचनेसह चालवणार असून त्यात एक वातानुकूलित चेअर कार आणि दोन विनावातानुकूलित चेअर कार जोडण्यात आल्या आहेत. नव्या संरचनेनुसार, एक प्रथम वातानुकूलित व द्वितीय वातानुकूलित श्रेणी, एक द्वितीय वातानुकूलित श्रेणी, तीन तृतीय वातानुकूलित श्रेणी, एक वातानुकूलित आसन व्यवस्था श्रेणी (चेअर कार), पाच शयनयान श्रेणी, दोन आरक्षित विनावातानुकूलित चेअर कार, दोन सामान्य द्वितीय श्रेणी (अनारक्षित) आणि दोन द्वितीय आसन व्यवस्था व सामानासह गार्ड ब्रेक व्हॅन अशी रचना करण्यात आली आहे.

नवीन संरचनेतील रेल्वेगाडी कधी धावेल?

गाडी क्रमांक १७६११ हुजूर साहेब नांदेड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस राज्यराणी एक्स्प्रेस ही सुधारित संरचनेसह हुजूर साहेब नांदेड येथून ४ ऑगस्टपासून चालविण्यास सुरुवात झाली. गाडी क्रमांक १७६१२ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते हुजूर साहेब नांदेड राज्यराणी एक्स्प्रेस ही सुधारित संरचनेसह छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ५ ऑगस्टपासून चालविण्यात येईल.