scorecardresearch

शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतू : मुंबई – नवी मुंबई दरम्यानच्या जलद प्रवासासाठी वर्षभराची प्रतीक्षा

सागरी सेतूमुळे नवी मुंबईतून अवघ्या २० मिनिटांमध्ये मुंबईत पोहोचणे शक्य होईल, असा आशावाद महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी व्यक्त केला.

mumbai nhava sheva shivadi bridge - Mumbai trans harbour link MTHL going to complete at the end of 2023
शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतू : मुंबई – नवी मुंबई दरम्यानच्या जलद प्रवासासाठी वर्षभराची प्रतीक्षा

मुंबई : राज्य सरकार आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) महानगर प्रदेशाला मुंबई जोडण्यासाठी निरनिराळ्या प्रकल्पांचा विचार करीत आहेत. त्यापैकीच एक असलेला मुंबई पारबंदर प्रकल्पातील शिवडी – न्हावा शेवा सागरी सेतू २०२३ अखेरीस वाहतुकीसाठी खुला करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. या सागरी सेतूमुळे नवी मुंबईतून अवघ्या २० मिनिटांमध्ये मुंबईत पोहोचणे शक्य होईल, असा आशावाद महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी व्यक्त केला. मात्र मुंबईतून नवी मुंबईत जलदगतीने पोहोचण्यासाठी नागरिकांना वर्षभर प्रतीक्षा करावी लागणार आहे.

द नॅशनल रियल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिलच्या (नरेडको) कर्जत – नेरळ शाखेच्या वतीने गुरुवारी ‘परवडणारे शहर मुंबई ३.०’ या विषयावर एका परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

मुंबईतील घरांच्या वाढत्या किंमती आणि घरांच्या अपुऱ्या संख्येमुळे सर्वसामान्य मुंबईकर मुंबई महानगर प्रदेशात स्थायिक होऊ लागले आहे. आता नवी मुंबई, ठाणे, वसई-विरार अशी दुसरी मुंबईही सर्वसामान्यांना परवडेनाशी झाली आहे. त्यामुळे परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी कर्जत-नेरळचा पर्याय पुढे आला आहे. येथील घरांच्या विक्रीत लक्षणीय वाढ होत असल्याचे या परिसंवादातून समोर आले. कर्जत-नेरळ परिसराचा विकास करण्यासाठी सरकार पायाभूत सुविधा प्रकल्प राबवीत आहे. यामुळे येत्या काळात येथील परिसराला निवासी आणि व्यावसायिकदृष्ट्या महत्त्व प्राप्त होईल. यातून बांधकाम क्षेत्राला चालना मिळेल असा विश्वास यावेळी ‘नरेडको’चे अध्यक्ष राजन बांदेलकर यांनी व्यक्त केला. या परिसंवादाला मुंबई महानगर प्रदेशातील विकासक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-07-2022 at 11:01 IST