मुंबई : गोवंडीमधील शिवाजी नगर परिसरात शुक्रवारी दुपारी गुन्हे शाखेच्या परिमंडळ ६ च्या अधिकाऱ्यांनी मोठी कारवाई करून एकूण १८ लाख रुपयांचा गुटखा जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून दोन टेम्पो जप्त करण्यात आले.
राज्यात गुटखा बंदी असताना गोवंडी परिसरात काहीजण मोठ्या प्रमाणात गुटख्याची अनधिकृतरित्या विक्री करीत असल्याची माहिती गुन्हे शाखा परिमंडळ ६ च्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार अधिकाऱ्यांनी गुरुवारी सायंकाळी शिवाजी नगर परिसरातील बैंगनवाडी येथील एका गोदामावर छापा घातला. पोलिसांनी या छाप्यात विविध कंपन्यांचा एकूण १८ लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त केला. त्याचबरोबर पोलिसांनी दोन टेम्पोही जप्त केले.
अब्दुल खान आणि तन्वीर खान अशी अटक आरोपींची नावे असून दोघेही गोवंडी परिसरातील रहिवासी आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून दोन्ही आरोपी गुटख्याची तस्करी करीत असल्याचे तपासात समोर आले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.