मुंबई : मराठा आंदोलनातनंतर आझाद मैदानात शिल्लक राहिलेल्या पाण्याच्या लाखो बाटल्यांची चोरी झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. या शिलल्क बाटल्या रुग्णालयात आणि अन्य सामाजिक कार्याच्या ठिकाणी वापरल्या जाणार होत्या. त्यानुसार पाण्याचे वाटपही झाले. मात्र त्यापूर्वीच या पाण्याच्या बाटल्यांची चोरी झाली आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्ट पासून मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन केले होते. या आंदोलनासाठी जमलेल्या लोकांसाठी राज्यभरातून जेवणासह पाण्याच्या लाखो बाटल्या पाठविण्यात आल्या होत्या. विविध जिल्ह्यातून पाण्याच्या बाटल्या भरून टेम्पो आझाद मैदानात दाखल होत होते. हा ओघ सतत सुरूच होता.
२ सप्टेंबर रोजी आंदोलन मागे घेण्यात आल्यानंतर त्या रात्री आंदोलकांनी मुंबई सोडली. त्यापूर्वी आंदोलकांनी शिल्लक अन्नपदार्थ व पाण्याच्या बाटल्यांचे बेघर व अन्य नागरिकांमध्ये वाटप केले होते. मात्र, त्यांनतरही पाण्याच्या लाखो बाटल्या आझाद मैदान व आसपासच्या परिसरात पडून होत्या. पालिकेने मैदानाची स्वच्छता केल्यानंतर हजारो भरलेल्या पाण्याच्या बाटल्या गोळा केल्या होत्या. तसेच, बाटल्या रुग्णालयांमध्ये पाठविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आंदोलकांनी पालिकेला विरोध केला.
शिल्लक बाटल्यांचा प्रश्न
या बाटल्यांचे ढिग आझाद मैदान परिसरातील रस्त्यांवर ठेवण्यात आले होते. आंदोलन संपल्यावर या बाटल्यांचे काय करायचे असा प्रश्न होता. संभाजीनगर व सांगलीतील दोन आंदोलकांनी बाटल्यांच्या वाटपाची जबाबदारी घेतली. सांगली येथील आंदोलक पंकज महाडिक याने शिवडी येथे आंदोलकांच्या गाड्यांमध्ये तसेच, रेल्वे स्थानकात सुमारे पाच हजार बाटल्यांचे वाटप केले. औरंगाबाद येथील आजिनाथ पठाडे यांच्याकडे हजारो बाटल्या होत्या. सुरुवातीला त्या बाटल्या विकून त्यातून येणारे पैसे जरांगे पाटील यांना देण्याचे त्यांचे नियोजन होते. मात्र, पाटील पैसे घेणार नाहीत, असा अंदाज बांधून त्यांनी ते नियोजन रद्द केले. त्यांनतर एका महिलेने त्या बाटल्यांची चोरी केल्याचा आरोप पठाडे यांनी केला आहे.
बाटली चोरीचा आरोप
दरम्यान, आझाद मैदानात ठिकठिकाणी पाण्याचे शेकडो बॉक्स ठेवण्यात आले होते. मात्र, रात्रीच्या वेळी अनेकजण कोणालाही न विचारता ते बॉक्स घेऊन जात होते, असा दावा आंदोलक निलेश कुरुमकर यांनी केला आहे. आंदोलनात पाण्याच्या बाटल्यांचा प्रचंड साठा जमा झाला होता. त्यामुळे त्या बाटल्या सराटी गावात आणण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
नारायणगडावर होणाऱ्या सोहळ्यात त्या बाटल्यांचे वितरण करण्यात येणार होते. मात्र, त्यांच्या वाहतुकीसाठी प्रचंड इंधन खर्च झाले असते. हा विचार करून त्या बाटल्यांचे गरजूंना वाटप करण्याचे ठरविण्यात आले होते. मात्र, प्रचंड प्रमाणात पाण्याच्या बॉक्सची चोरी झाल्याचा आरोप कुरुमकर यांनी केला. आंदोलकांना गरज असताना मुंबईतून कोणीही मदतीचा हात पुढे केला नाही मात्र, आंदोलनानंतर चोरी करण्यात त्यांनी तत्परता दाखवली, अशी टीका अहिल्यानगरचे आंदोलक गोरख दळवी यांनी केली.