मुंबई : मध्य रेल्वेच्या सर्वात प्रतिष्ठित आणि लोकप्रिय रेल्वेगाडीपैकी एक असलेली ‘डेक्कन क्वीन’ १ जून २०२५ रोजी ९६व्या वर्षांत पदार्पण करत आहे. ‘दख्खनची राणी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या ‘डेक्कन क्वीन’ची प्रवासी सेवेची ९५ वर्षे पूर्ण झाली आहेत. आर्थिक राजधानी मुंबई आणि सांस्कृतिक राजधानी पुणेदरम्यान १ जून १९३० रोजी ही रेल्वेगाडी धावू लागली. त्यावेळी ती ‘ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे’ (जीआयपीआर) मार्गावर धावत होती.
‘डेक्कन क्वीन’चा इतिहास दोन शहरांची गोष्ट आहे. या रेल्वेगाडीच्या वक्तशीरपणामुळे मुंबई आणि पुण्यातील प्रवासी समाधानी आहेत. गेल्या ९५ वर्षांमध्ये इतिहासात ही रेल्वेगाडी दोन शहरांमधील प्रवाशांसाठी महत्त्वाचा दुवा बनली आहे. या दोन महत्त्वाच्या शहरांना सेवा देणारी ही पहिली डिलक्स ट्रेन होती. त्यामुळे तिला ‘डेक्कन क्वीन’ असे नाव देण्यात आले.
महत्त्वाचे टप्पे
- सुरुवातीला फक्त प्रथम श्रेणी आणि द्वितीय श्रेणी
- १ जानेवारी १९४९ रोजी प्रथम श्रेणी रद्द, द्वितीय श्रेणीची प्रथम श्रेणी म्हणून पुनर्रचना
- एप्रिल १९७४पासून १२ डब्यांची डेक्कन क्वीन
- १९९५मध्ये पाच डब्यांची वाढ
- १५ ऑगस्ट २०२१ रोजी विस्टाडोम डबा
- २२ जून २०२२पासून एलएचबी डबे
१९९५पासून रचनेत बदल
- सर्व नवीन उत्पादित किंवा सुमारे एक वर्ष जुने, एअर ब्रेक डबे
- जुन्या रेकमधील ५ प्रथम श्रेणी चेअर कारच्या जागी ५ एसी चेअर कार. धूळमुक्त वातावरणात ६५ आसनांची वाढ
- ९ द्वितीय श्रेणीच्या चेअर कार जुन्या डब्यांच्या तुलनेत १२० आसनांची अतिरिक्त आसन क्षमता प्रदान करण्यात आली. जुन्या रेकमध्ये १,२३२ जागांच्या तुलनेत नवीन रेकमध्ये एकूण १,४१७ आसन क्षमता वाढली. त्यामुळे १५ टक्क्यांनी आसन क्षमतेत वाढ.
- डेक्कन क्वीनमध्ये टेबलची सुविधा. मायक्रोवेव्ह ओव्हन, डीप फ्रीझर आणि टोस्टर यांसारख्या आधुनिक पॅन्ट्री सुविधांसह डायनिंग कार.
- डायनिंग कार कुशनच्या खुर्च्या आणि कार्पेटने सुसज्ज.