मुंबई : पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप असलेल्या ज्योती मल्होत्राने मुंबईतील रेल्वे, बेस्ट बसने प्रवास केल्याची माहिती समोर आली आहे. ज्योती मल्होत्रा प्रकरण आणि पहलगाम दहशतवादी हल्ला, भारत-पाकदरम्यान निर्माण झालेली युद्धसदृश्य स्थिती या पार्श्वभूमीवर मुंबईतील रेल्वे स्थानकांवर श्वान पथके सज्ज करण्यात आली आहेत. बेल्जियन मालिनोआस प्रजातीचा श्वान मुंबईच्या रेल्वे स्थानकात गस्तीवर आहे. बेल्जियन मालिनोआस प्रजातीच्या श्वानाचा वापर अतिरेकी ओसामा बिन लादेनच्या पाकिस्तानमधील ॲबोटाबाद येथील गुप्त जागेचा शोध घेण्यासाठी करण्यात आला होता.
पाकिस्तानची हेर ज्योती मल्होत्राने अनेकदा मुंबईला भेट दिल्याचे उघडकीस आले आहे. गणेशोत्सव काळात ज्योतीने मुंबईतील गर्दीच्या गणेशोत्सव मंडळांना भेटी दिल्या होत्या. तसेच, तिने लोकल, बेस्ट बस आणि अनेक रेल्वेगाड्यांमधून प्रवास केल्याची माहिती समोर आली आहे. तिने मुंबईची रेकी केली होती का, त्यामागचा उद्देश काय होता, याचा तपास यंत्रणा करीत आहेत. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेला बळकटी देण्यासाठी श्वान पथक सज्ज करण्यात आले आहे. यासह इतर सुरक्षा यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.
मुंबई आणि उपनगरांमध्ये मिळून एकूण १३९ स्थानके आहेत. या स्थानकांमधून दररोज ७५ ते ८० लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. या प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी श्वान पथकांवर आहे. लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्यासह लोकलमध्येही तपासणी करण्यात येत आहे. श्वान पथकांमार्फत आता नियमितपणे डब्यांची तपासणी करण्यात येत आहे. बेल्जियन मालिनोआससह लॅब्राडोर रिट्रिव्हर, जर्मन शेफर्ड, डॉबरमन या प्रजातींचे श्वान या पथकात आहेत.
मुंबईतील सर्वात व्यस्त वाहतूक केंद्रांपैकी एक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), चर्चगेट, मुंबई सेंट्रल, दादर, वांद्रे टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि कल्याण यासारख्या इतर प्रमुख स्थानकांवर जागता पहारा ठेवला आहे. मुंबईतील रेल्वे स्थानकावरील रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा दल, महाराष्ट्र सुरक्षा दल, गृहरक्षक व इतर सुरक्षा व्यवस्थेला बळकटी दिली आहे.
- रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सशस्त्र जलद प्रतिसाद पथक (क्यूटीआर) सज्ज करण्यात आले आहे.
- आरपीएफ आणि रेल्वे पोलीस गस्त घालत आहेत.
- प्रवासी आणि त्यांच्या सामानाची सखोल तपासणी करण्यात येत आहे.
- मुंबई सेंट्रल विभागात तीन हजारांहून अधिक सीसी टीव्ही कॅमेऱ्याद्वारे लक्ष ठेवण्यात येत आहे.