मुंबई : मुंबईत यंदा वार्षिक सरासरीच्या १०५ टक्के पाऊस पडला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या पर्जन्यमापक यंत्रावर नोंद झालेल्या आकडेवारीनुसार यंदा मुंबईत १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. गेल्यावर्षी याचवेळी ९५ टक्के पाऊस पडला होता. यंदा मुंबईतही खूप पाऊस पडला असून मुंबईबाहेरील धरणक्षेत्रातही मुबलक पाऊस पडला असून मुंबईला पाणी पुरवठा करणारी धरणे ९९ टक्के भरली आहेत.
दरम्यान, सोमवारी सकाळी मुंबई शहर आणि उपनगरात पावसाने दमदार हजेरी लावली. यंदाच्या पावसाळ्यात पावसाने प्रत्येक वेळी सोमवारचा मुहूर्त गाठत नोकरदारांची दैना उडवली होती. तशीच २२ सप्टेंबरलाही सोमवारी सकाळी मुसळधार कोसळण्याचा या पावसाळ्यातील क्रम पावसाने कायम ठेवला. पावसामुळे वातावरणात थोडा गारवा आल्यामुळे उकाड्यापासून मुंबईकरांना दिलासा मिळाला.
दरवर्षी पावसाळ्याच्या चार महिन्यात मुंबईत सुमारे २२०० मिमि पाऊस पडतो. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार कुलाबा येथे २०९५ मिमी वार्षिक पावसाची सरासरी असते तर सांताक्रूझ येथे २३१९ मिमी इतकी पावसाची वार्षिक सरासरी आहे. मुंबईत यंदा मे महिन्यातच पावसाला सुरूवात झाली होती. गेल्या तीन साडेतीन महिन्यात मुंबई वार्षिक सरासरीच्या १०५ टक्के पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. मुंबई महापालिकेच्या स्वयंचलित पर्जन्यमापक यंत्रावर शहर भागात ९६ टक्के पाऊस पडला. तर उपनगरात १०६ टक्के पाऊस पडला. एकूण पावसाची टक्केवारी १०५.२० टक्के इतकी आहे. तर हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार सांताक्रूझ केंद्रावर वार्षिक १२५ टक्के पावसाची तर कुलाबा येथे ९२ टक्के पावसाची नोंद झाली आहे.
अंधेरीत पाणी साचले….
दरम्यान, मुंबईत शहर आणि उपनगरात सोमवारी २२ सप्टेंबर रोजी सकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली. नोकरदारांच्या कामाला जाण्याच्या वेळीच पावसाने हजेरी लावल्यामुळे लोकल, बस पकडण्यासाठी वेळ गाठणाऱ्यांचे हाल झाले. अनेकांना पावसात भिजतच कार्यालय गाठावे लागले. सोमवारी सकाळी एक दोन तास कोसळल्यानंतर दिवसभर मात्र पावसाने विश्रांती घेतली. या पावसामुळे मुंबईत कुठेही पाणी साचल्याची तक्रार आलेली नसली तरी अंधेरी पश्चिम येथील वीरा देसाई मार्गावर मात्र रस्त्यावर चांगलेच पाणी साचले होते. साचलेल्या पाण्यातून वाहने वाट काढत होती. मोगरा नाला दुथडी भरून वाहू लागल्यामुळे या परिसरात पाणीचपाणी झाले होते. शहरातील भायखळा, दादर, वरळी, परळ, प्रभादेवी तसेच उपनगरातील वांद्रे, अंधेरी, बोरिवली, दहिसर भागात पावसाचा जोर अधिक होता. कुलाबा येथे सोमवारी सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत २० मिमी, तर सांताक्रूझ केंद्रात ३ मिमी पावसाची नोंद झाली.
मुंबईत दिवसभरात सहा ठिकाणी झाडे व फांद्या पडल्याची नोंद झाली. तर चार ठिकाणी पावसामुळे विद्युुत यंत्रणेत दोष निर्माण झाल्याची तक्रार पालिकेच्या आपात्कालीन विभागाकडे आली. तर दोन ठिकाणी घर किंवा घराचा भाग पडल्याची नोंद झाली.
उकाड्यापासून दिलासा
मुंबईत सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाचा जोर नव्हता. अधूनमधून हलक्या सरी बरसल्या. पावसाने ओढ दिल्यामुळे मागील काही दिवस मुंबईकरांना असह्य उकाड्याचा सामना करावा लागत होता. तसेच तापमानातही वाढ झाली होती. मुंबईत सोमवारी कोसळलेल्या पावसामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात सोमवारी २७ अंश सेल्सिअस तर, सांताक्रूझ केंद्रात २७.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. सरासरीपेक्षा दोन्ही केंद्रावर ३ अंशाने कमी तापमानाची नोंद झाली. मागील काही दिवस साधारण तापमानाचा पारा ३० अंशापुढे नोंदला जात होता.