Mumbai Maratha Reservation Protest Manoj Jarange : मुंबई : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मराठा आंदोलक मुंबईत येण्यासाठी प्रचंड धावपळ करत आहेत. ज्या मार्गाने, ज्या वाहनाने मुंबई गाठता येईल, तशी मुंबई गाठून मनोज जरांगे पाटील यांना पाठींबा दिला जात आहे. अशात मध्य रेल्वेने रविवारी मेगाब्लाॅक घेण्याचा निर्णय घेतला होता.

रविवारी मेगाब्लाॅक घेतला असता तर वाशी एक्झिबिशेन सेंटर वा इतर ठिकाणाहून आझाद मैदानावर येणार्‍या मराठा आंदोलकांची मोठी गैरसोय झाली असती. मात्र, मध्य रेल्वे प्रशासनाने मेगाब्लॉक रद्द केल्याने, हार्बर रेल्वे मार्गावरील लोकल सेवा सुरू राहील. त्यामुळे पनवेल, वाशी, नेरुळ, रे रोड, शिवडी, डॉकयार्डवरून ये-जा करणाऱ्या मराठा आंदोलकांना दिलासा मिळाला.

रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा, ओव्हर हेड वायरची देखभाल-दुरूस्ती करण्यासाठी, रविवारी मध्य रेल्वेवर ब्लाॅक घेण्याचे नियोजन होते. परिणामी, मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गिकेवरील चिंचपोकळी आणि करी रोड येथील लोकल थांबा रद्द होणार होता. तर, सीएसएमटी ते वाशी/बेलापूर/पनवेल दरम्यानची अप आणि डाऊन लोकल सेवा रद्द होणार होती. त्यामुळे मुंबईत येणाऱ्या गणेशभक्तांची, मराठा आंदोलकांची प्रचंड गैरसोय होण्याची चिन्हे होती. तसेच मराठा आंदोलकांच्या व्हाट्सअॅप ग्रुपवर मेगाब्लॉकबाबत संदेश प्रसारित होत होते.

मेगाब्लॉकबाबत मराठा आंदोलकांना जागृत करून, मेगाब्लॉकच्या कालावधीत प्रवास न करण्याचे आवाहन केले जात होते. तसेच मेगाब्लॉक घेण्यामुळे मध्य रेल्वे प्रशासनावर संताप व्यक्त केला गेला. मेगाब्लॉक बाबत ‘लोकसत्ता’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर मध्य रेल्वे प्रशासनाने ब्लॉक रद्द करण्याचा निर्णय घेतला.

राज्यभरातून मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेने येत आहे. ठाणे व पनवेलहून मुंबईमध्ये जलद गतीने येण्यासाठी पूर्वमुक्त महामार्ग हा सर्वात सोयीस्कर मार्ग आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून या मार्गावरून हजारोंच्या संख्येने मराठा आंदोलक येत आहेत. आंदोलकांच्या वाहनांच्या ताफ्यामुळे पूर्व मुक्त महामार्गावरील वाहतूक सेवेला फटका बसला. यासह मराठा आंदोलक आपली वाहने पनवेल, वाशी, नेरुळ, कुर्ला, रे रोड, शिवडी, डॉकयार्ड येथे उभी करून रेल्वेने आझाद मैदानाच्या दिशेने येत आहे. मराठा आंदोलकांनी शनिवारी मुंबई महानगरपालिका परिसरात ठिय्या मांडल्याने या परिसरात येणाऱ्या विविध रस्त्यांवर आंदोलकांनी गाड्या उभ्या केल्या. रविवारचा मेगा ब्लॉक रद्द करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने दिली.