मुंबई : मुंबईत मागील दोन दिवसांपासून संततधार पाऊस कोसळत आहे. आज सलग तिसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम आहे. शहर तसेच उपनगरात रविवारी मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. पुढील काही तास पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. काही भागात कमी वेळात अधिक पावसाची नोंद होण्याची शक्यता देखील आहे.
मागील पंधरा दिवस दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. मुंबईत शुक्रवारपासून पाऊस पडत आहे. आज पहाटेपासून पुन्हा पावसाने जोर धरला आहे. अंधेरी, घाटकोपर, तसेच दक्षिण मुंबई आणि नवी मुंबई परिसरात पहाटेपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसाचे प्रमाण पुढील काही तासांत आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नये असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.
कमी दाब क्षेत्र
बंगालच्या उपसागरात लागोपाठ दोन कमी दाब क्षेत्र निर्माण झाल्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा जैसलमेर, उदयपूर, रतलाम, कमी दाब क्षेत्राचे केंद्र, जगदलपूर ते पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. ईशान्य अरबी समुद्रात गुजरात आणि कोकणाच्या किनारपट्टीलगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. अरबी समुद्रापासून गुजरात, कोकण, उत्तर मराठवाडा, ते दोन्ही कमी दाबाच्या केंद्रांदरम्यान १.५ ते ५.८ किलोमीटर उंचीपर्यंत हवेचा पूर्व-पश्चिम कमी दाबाचा पट्टा कायम आहे.
कोकण घाटमाथ्यावर रेड अलर्ट
आज कोकण आणि घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा (रेड अलर्ट) देण्यात आला आहे. कोकणात या कालावधीत सर्वाधिक पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. याचबरोबर घाटमाथ्यावरही आज पावसाचा जोर वाढणार आहे.
दोन कमी दाब क्षेत्र पोषक
उत्तर आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशाच्या किनाऱ्यालगत नवीन कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. याची तीव्रता वाढून, मंगळवारी ही प्रणाली जमिनीवर येण्याची शक्यता आहे. याचबरोबर विदर्भ आणि परिसरावर आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले असून, त्याला लागून समुद्रसपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वारे वाहत आहेत. ही प्रणाली पश्चिमेकडे सरकून आज गुजरातकडे जाण्याची शक्यता आहे. या दोन्ही प्रणाली राज्यात पाऊस वाढविण्यास पोषक ठरणार आहेत.
गेल्या तीन तासांत मुंबईत झालेला पाऊस
- कुलाबा उद्दंचन केंद्र – १३.२२ मिमी
- चर्चगेट स्थानक- ८.४ मिमी
- ए वॉर्ड कार्यालय – १२.८ मिमी
- मुंबई महानगरपालिका कार्यालय- १५.२ मिमी
- नायर रुग्णालय- १३.९७ मिमी
- दादर अग्निशमन केंद्र – १३.२ मिमी
- वरळी महानगरपालिका शाळा- १७ मिमी
- जी साऊथ वॉर्ड- १५.२४ मिमी
- वांद्रे अग्निशमन केंद्र -१९.३ मिमी
- रावळी कॅम्प – १५.२३ मिमी
आज पावसाचा इशारा कुठे
- अतिमुसळधार पाऊस – मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली
- अतिवृष्टीचा इशारा – रत्नागिरी, रायगड, पुणे घाट परिसर, कोल्हापूर घाट परिसर, सातारा घाट परिसर
- मेघगर्जनेसह पाऊस – धुळे, नंदुरबार, नाशिक, अहिल्या नगर, अकोला, भंडारा, हिंगोली, नांदेड, बुलढाणा, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ