मुंबई : गणेशोत्सवानिमित्त मुंबईहून कोकणात जाणाऱ्यांना प्रवासाचा एक अतिजलद पर्याय उपलब्ध होणार आहे. मुंबई – विजयदुर्ग, देवगड, सिंधुदुर्ग रो रो सेवा गणेश चतुर्थीपूर्वी दोन – तीन दिवस आधी रो रो सेवा सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्र सागरी मंडळाने घेतला आहे. त्यानुसार विजयदुर्ग येथील जेट्टीत सुधारणा करण्यासह मुंबईतील माझगाव येथे रो रो सेवेच्या दृष्टीने पायाभूत सुविधा विकसित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

हे काम २० ऑगस्टपर्यंत पूर्ण करून तात्काळ रो रो सेवेच्या चाचण्या (ट्रायल रन) करण्यात येणार आहेत. ही सेवा सुरू झाल्यास गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात, विजयदुर्ग, देवगडला केवळ सहा तासांत पोहोचता येणार आहे. रो रो सेवेच्या दिवसाला दोन फेऱ्या (येणारी-जाणारी) होणार असून या वेळी बोटीतून एका वेळी ५० ते ६० चारचाकी वाहने आणि ४०० ते ५०० प्रवासी जाऊ शकतील.

मुंबई ते मांडवा अशी रो रो सेवा पुरविणाऱ्या एम टू एम कंपनीची एक बोट मुंबई ते विजयदुर्गदरम्यान धावणार आहे. ही बोट दोन ते तीन मजली आहे. देवगड, मालवण, राजापूरला जाणाऱ्या प्रवाशांसाठी हा एक चांगला पर्याय असेल आणि याला चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास बंदर प्राधिकरणाने व्यक्त केला. तेथे पोहोचण्यासाठी कोकण रेल्वेने किमान १० ते ११ तास प्रवास करावा लागतो, तर एसटीने वाहतूक कोंडीचा सामना करीत १४ तासांहून अधिक वेळ लागतो. लवकरच दर निश्चित करून जाहीर करण्यात येतील. त्यानंतर आरक्षणाला सुरुवात होईल.