मुंबई : मुंबईत शुक्रवारी सांताक्रूझ येथे ३७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. शहरात शुक्रवारी सकाळपासून उष्ण वारे जाणवत होते. उष्ण वाऱ्यांमुळे नागरिकांना तप्त झळा सहन कराव्या लागत होत्या. तापलेल्या वातावरणामुळे शुक्रवारी मुंबईकरांच्या अंगाची काहिली झाली. दरम्यान, पुढील एक – दोन दिवस तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यामुळे मुंबईकरांना आणखी काही दिवस उकाडा आणि उन्हाच्या तडाख्याचा सामना करावा लागेल.
मागील काही दिवसांपासून कमाल तापमानात वाढ झाली आहे. साधारण ३४ ते ३५ अंशादरम्यान तापमान नोंदले जात होते. मात्र, मुंबईच्या तापमानात शुक्रवारी आणखी वाढ झाली. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात ३५.६ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात ३७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. सांताक्रूझ येथील तापमान सरासरीपेक्षा ३.३ अंशानी अधिक नोंदले गेले. समुद्रावरून येणारे वारे उशिरा वाहत असल्यामुळे मुंबईच्या तापमानात वाढ झाल्याचे हवामान विभागाने सांगितले.
तापमानातील ही वाढ पुढील दोन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, अचानक तापमानात वाढ झाल्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास होत आहे. उकाडा आणि उन्हाचा ताप यामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. रेल्वेतील प्रवासही असह्य होत आहे. शहर आणि उपनगरांत शुक्रवारी दुपारी उन्हाचा दाह सोसावा लागत होता. कडकडीत ऊन, घामाच्या धारा आणि प्रचंड उकाड्याने मुंबईकर हैराण झाले आहेत. मागील काही दिवसांपासून उन्हाच्या झळांनी नागरिकांची लाही होत आहे. रस्त्यावर फिरताना उन्हाचे चटके बसत होते. ऑक्टोबरमधील पुढील दिवस तापमान कसे राहील ही चिंता आता नागरिकांना सतावू लागली आहे.
कोरड्या वातावरणाचा अंदाज
मुंबईत पुढील दोन ते तीन दिवस कोरड्या वातावरणाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे काही दिवस उकाडा सहन करावा लागणार आहे.