मुंबई : विधानसभेमध्ये रमी खेळणारे तत्कालीन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा मागितला म्हणून ‘छावा’ संघटनेच्या प्रदेशाध्यक्षांना भरसभेत मारहाण करणारा अजित पवार गटाच्या ‘राष्ट्रवादी काँग्रेस’चे माजी युवा प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण राज्याचे नवे ‘युवा धोरण’ बनवणार आहेत. चव्हाण यांना विशेष निमंत्रित सदस्य म्हणून युवा धोरण बनवणाऱ्या समितीमध्ये घेण्यात आले असून त्यासाठी गुरुवारी सुधारीत शासन निर्णय जारी केला.

राज्याने २०१२ मध्ये युवा धोरण बनवले होते. क्रीडा विभाग सध्या राष्ट्रवादीकडे आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘राज्याचे नवे युवा धोरण बनवा’ असे आदेश दिले होते. त्यानुसार क्रीडा मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली २८ मे रोजी २० सदस्यांची समिती बनवण्यात आली. त्यानंतर २७ जून रोजी पुन्हा शासन निर्णय जारी करत १७ सदस्यांचा विशेष निमंत्रित सदस्य म्हणून समितीत समावेश करण्यात आला.

३७ सदस्यांची समिती झाली तरी धोरण बनवणे दूरच ५ सप्टेंबर रोजी भाजपच्या आणि राष्ट्रवादीचा एका, एका आमदाराचा विशेष निमंत्रित सदस्य म्हणून समावेश करण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भात आज आढावा बैठक घेतली आणि त्यानंतर चौथा शासन निर्णय काढत सूरज चव्हाण यांच्यासह दोन कार्यकर्त्यांचा विशेष निमंत्रित सदस्य म्हणून युवा धोरण समितीमध्ये समावेश करण्यात आला.

अशा प्रकारे राज्याचे नवे युवा धोरण बनवण्यासाठी जी समिती गठीत झाली आहे, त्याची सदस्य संख्या ४३ पर्यंत गेली. या जंबो समितीमध्ये १५ आमदार असून राजकीय पार्श्वभूमीच्या युवकांचा भरणा मोठा आहे. या बहुसदस्यीय समितीमध्ये एकही नामवंत खेळाडू नाही. योगायोग म्हणजे तत्कालीन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा मागणाऱ्या कार्यकर्त्यांना सूरज चव्हाण याने मारहाण केली होती, त्याच कोकाटे यांनी चव्हाण यांना समितीमध्ये संधी दिली.

केंद्र शासनाच्या धोरणाशी सुसंगत पण युवक कल्याण क्षेत्रात होणारे कालपरत्वे बदल लक्षात घेवून युवांना सहाय्य ठरतील अशा बाबींचा नव्या युवा धोरणात समावेश करणे अपेक्षीत आहे. हेे नवे धोरण तीन महिन्यात बनवायचे होते. मात्र गेली पाच महिने झाले तरी समितीचे गठन चालू आहे. महायुती सरकार सत्तेत आले तेव्हा राष्ट्रवादीचे दत्ता भरणे क्रिडा मंत्री होते, सध्या राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटे या विभागाचे मंत्री आहेत.