मुंबई : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजनेद्वारे हजारो तरुणांनी रोजगाराचे प्रशिक्षण घेतले आहे. मात्र, अद्यापही त्यांना नोकरी न मिळाल्याने तरुणांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. योजनेतून प्रशिक्षण घेतलेल्या पाच लाख तरुणांकडे रोजगार नसल्याचा दावा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाने केला आहे. शासनाने प्रशिक्षणार्थी तरुणांना कायमस्वरूपी नोकरी देण्याचा निर्णय तातडीने घ्यावा, अन्यथा मंत्रालयाबाहेर काळे कंदील लावून आंदोलन करण्याचा इशारा शरद पवार गटाकडून देण्यात आला आहे.
फडणवीस सरकारने युवकांची फसवणूक केली आहे. पाच लाखांहून अधिक तरुणांना प्रशिक्षण देऊनही त्यांना कायमस्वरूपी नोकरी देण्यात आलेली नाही. सरकारने रोजगार हमी कायदा करण्याचे आश्वासन दिले होते, पण त्याबाबतही कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही. प्रशिक्षण काळात दिले जाणारे मानधन तुटपुंजे आणि अपुरे असून, काहींना ते देखील वेळेवर मिळालेले नाही. कौशल्य विकास या नावाखाली केवळ कागदी यश दाखविण्यात आले, असा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून करण्यात आला आहे.
प्रशिक्षण घेऊनही नोकरी मिळाली नसल्याने तरुणांमध्ये प्रचंड असंतोष वाढू लागला आहे. शासनाने रोजगाराबाबत तातडीने निर्णय घ्यावा. याबाबत निर्णय न झाल्यास आम्ही दिवाळी साजरी करणार नाही. शासनाने प्रशिक्षण देऊन नोकरीचे आश्वासन दिले. पण ते पूर्ण केले नाही. बेरोजगारीच्या आगीत होरपळणाऱ्या तरुणांकडे सरकारने पाठ फिरवली आहे. त्यामुळे यंदा दिवाळीत मंत्रालयाबाहेर काळे कंदील लावून आंदोलन करू, असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने पक्षाचे प्रवक्ते व युवकचे मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी दिला.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजनेतील सर्व प्रशिक्षित तरुणांना कायमस्वरूपी नोकरी द्यावी, रोजगार हमी कायदा तातडीने लागू करावी, सर्व प्रशिक्षणार्थींचे थकीत मानधन तातडीने द्यावे, राज्यातील बेरोजगारीवर स्वतंत्र श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी, रोजगार निर्मितीसाठी स्थायी धोरण आणि वेळापत्रक जाहीर करावे आदी मागण्या पक्षातर्फे करण्यात आल्या आहेत.
