मुख्यमंत्रीबदलाची चर्चा काँग्रेसमध्ये सुरू असतानाच राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्येही बदलाचे वारे वाहात आहेत. राष्ट्रवादीच्या काही मंत्र्यांना पक्षसंघटनेत आणले जाईल, असे संकेत पक्षाध्यक्ष शरद पवार यांनीच शुक्रवारी दिले.
शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान या कोणत्याच सभागृहाच्या सदस्य नसल्याने त्यांना वगळले जाण्याची शक्यता आहे. प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांचा मंत्रिमंडळात समावेश करून त्यांच्या जागी  जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. बदलांबाबत पवार यांनी शुक्रवारी छगन भुजबळ आणि आर. आर. पाटील यांच्याशी चर्चा केली. सिंचन घोटाळ्यात अजित पवार यांच्याबरोबरच तटकरे यांचे नाव घेतले जात होते. चितळे समितीच्या अहवालात कोणत्याही मंत्र्यांवर ताशेरे ओढण्यात आलेले नाहीत. यामुळेच तटकरे यांच्या नावाचा विचार केला जात आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सरकार आणि पक्षसंघटनेत काही बदल केले जातील, असे पवार यांनी सूचित केले.