मुंबई : राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले असून, पुढील तीन दिवस काही भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. या कालावधीत विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे. इतर भागात पावसाची उघडीप राहील.मागील काही दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. अधूनमधून हलक्या सरी बरसत आहेत.
मात्र, मुसळधार पावलाची शक्यता नाही. दरम्यान, सध्या राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पुढील दोन – तीन दिवस विदर्भासह मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाची शक्यता आहे. याव्यतिरिक्त इतर भागात मात्र पावसाची फारशी शक्यता नाही. पावसाने उघडीप दिल्यामुळे पुन्हा एकदा उकाड्याची जाणीव सहन करावी लागत आहे. अनेक भागात तापमानाचा पारा ३२ अंश सेल्सिअसपुढे नोंदला जात आहे.
मोसमी वाऱ्यांचा प्रवास जैसे थे
नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रवास मागील सात दिवसांपासून एकाच जागी आहे. मोसमी पावसाचा परतीचा प्रवास १४ सप्टेंबरपासून राजस्थानमधून सुरू झाला होता. त्यानंतर काही दिवसांनी गुजरात, राजस्थानच्या आणखी काही भागातून मोसमी वाऱ्यांनी माघार घेतली. त्यानंतर मागील सात दिवासांपासून मोसमी वाऱ्यांचा प्रवास मंदावला आहे.
अमरावती येथे सर्वाधिक तापामानाची नोंद
अमरावती येथे शुक्रवारी सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. तेथे ३४.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. त्याखालोखाल अकोला येथे ३३.८ अंश सेल्सिअस, चंद्रपूर ३३ अंश सेल्सिअस, वर्धा ३३ अंश सेल्सिअस आणि नागपूर येथे ३३.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
पावसाचा अंदाज कुठे
मेघगर्जनेसह पाऊस
अहिल्यानगर, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव
विजांसह पाऊस
चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ