मुंबई : ओला, उबर किंवा अन्य अॅप आधारित रिक्षा, टॅक्सी आणि कॅबची बुकिंग करत असाल आणि ते वाहन येण्याची वाट बघत असाल तर, आताच विचार करा. आज, १७ जुलै रोजी अॅप आधारित रिक्षा, टॅक्सी आणि कॅब चालकांनी १०० टक्के बंदचा नारा दिला आहे. अॅप आधारित वाहन बंद असल्याने, पर्यायी वाहनांचा वापर करावा लागेल. संपूर्ण दिवसभर मुंबई शहर, पूर्व-पश्चिम उपनगरे, ठाणे, पालघर, रायगड, पुणे, नाशिक येथील नोकरदार वर्गाचा खोळंबा होण्याची चिन्हे आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून मुंबई, पुणे, नागपूर आणि राज्यातील अन्य शहरांमध्ये अॅप आधारित वाहनांच्या चालकांचा संप सुरू आहे. राज्यातील प्रत्येक भागात या संपाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. तर, या संपाची व्यापकता वाढविण्यासाठी अॅप आधारित वाहन चालक वर्ग एकत्र आला आहे. या चालकांनी उत्स्फूर्तपणे अॅप आधारित वाहन सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, जे चालक ही सेवा सुरू ठेवतील, त्यांना सेवा बंद करण्याचे आवाहन केले जाणार आहे.
सर्व चालकांचा अभिप्राय घेऊन बंदचा नारा
गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानात शेकडो चालकांचे आंदोलन सुरू आहे. या संपात राज्यातील अॅप आधारित वाहन चालक एकवटला आहे. प्रत्येक चालकाचा अभिप्राय घेऊन संप करण्यात आला आहे. चालकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे आज १०० टक्के बंद केला जाणार आहे, असे महाराष्ट्र कामगार सभेचे अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर यांनी सांगितले.
पुणे आणि नाशिकवरून मुंबईला येणाऱ्या प्रवाशांचे हाल
मुंबईतील बॅंका, मंत्रालय, विधानभवन, महापालिका, शासकीय, निमसरकारी, खासगी व इतर कार्यालयात काम करणारा नोकरदार वर्ग पुणे आणि नाशिक येथून येतो. तेथील बहुसंख्य नोकरदार वर्गाकडून अॅप आधारित वाहनांचा वापर केला जातो. तसेच अनेक प्रवासी मुंबईवरून पुणे, नाशिक जाण्यासाठी थेट ओला, उबर आरक्षित करून इच्छित स्थळ गाठतात. मात्र, गुरुवारी चालकांनी १०० टक्के बंदचा नारा दिल्याने पुणे आणि नाशिकवरून मुंबईला येणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होणार आहेत. या प्रवाशांना रेल्वे, एसटी व इतर वाहतूक सेवेचा वापर करावा लागेल. मात्र, या सेवा मर्यादित असल्याने प्रवाशांची मोठी कोंडी होईल.
उबर कंपनीची चालकांना साद
प्रिय (चालकाचे नाव), आम्हाला माहिती आहे की, मुंबई आणि पुण्यात काही अडचणी आहेत. मात्र, या शहरांत प्रवाशांची मागणी खूप जास्त आहे आणि रस्त्यावर तुमची उपस्थिती खूप मोलाची आहे. जर कोणी फेरी घेण्यास अडवण्याचा प्रयत्न करत असेल किंवा तुम्हाला अडचण येत असेल, तर कृपया जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधा. तसेच उबर अॅपमधून थेट ११२ डायल करून पोलिसांची मदत घेऊ शकता. सुरक्षित रहा आणि उबरसह ड्रायव्हिंग सुरू ठेवा, अशा आशयाचा संदेश प्रत्येक चालकाला पाठवण्यात आला आहे.
चालकांचे आंदोलन का सुरू आहे ?
राज्यभरात सर्व अॅप आधारित वाहने सुमारे १८ लाख असून त्या वाहनांवर १८ लाखांहून अधिक चालकांचे घर चालते. सुरुवातीच्या काळात अॅप आधारित वाहन चालकांना कंपन्यांनी अनेक प्रलोभने दिली. परंतु, आता त्यांच्याकडून प्रति किमी कमी भाडे दिले जाते. या चालकांना प्रति किमी ८ ते १२ रुपये मिळतात. याउलट प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (आरटीओ) निश्चित केलेल्या दराच्या तुलनेत अत्यल्प रक्कम चालकांना मिळते. त्यामुळे सर्व अॅप आधारित सेवा सुरू राहावी, यासाठी अॅग्रीकेटर कंपन्यांनी आरटीओने निश्चित केलेले दर लागू करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.