मुंबई – गुगलवर जाऊन एका विमा कंपनाचा क्रमांक शोधणाऱ्या महिलेचा मोबाईल सायबर भामट्यांनी हॅक करून त्यांच्या खात्यातील दिड लाख रुपये लंपास केले आहेत. विमा कंपनीच्या नावाने बनावट क्रमांक टाकला होता. या महिलेला एक फाईल डाऊनलोड कऱण्यास सांगून त्यांचा मोबाईल हॅक केला आणि अर्ध्या तासात त्यांच्या बँक खात्यातील दिड लाख रुपये काढून घेतले. या फसवणुकी प्रकरणी पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार ६४ वर्षांच्या असून त्या पवईच्या हिरानंदानी गार्डन परिसरात राहतात. त्यांनी आपल्या वाहनाचा विमा एका प्रसिध्द विमा कंपनीकडून काढला होता. त्यांना २१ मे रोजी विम्याचे कागद हवे होते. त्यासाठी त्यांनी कंपनीशी संपर्क साधण्यासाठी गुगलवर शोध घेतला. त्यावेळी कंपनीच्या नावे असलेला एक संपर्क क्रमांक मिळाला. तक्रारदार महिलेने त्या इसमाकडे विम्याच्या कागदपत्रांची मागणी केली. त्या इसमाने ९ रुपये भरावे लागतील असे सांगितले. नंतर त्याने फिर्यादी यांच्या व्हॉटसअपक्रमांकावर एक कस्टमर सपोर्ट नावाची एक ‘एपीके’ फाईल पाठवून ती डाऊनलोड करण्यासाठी सांगितले. त्यानुसार फिर्यादी यांनी ती फाईल डाऊनलोड केली.

दरम्यान, काही वेळातच तक्रारदार यांच्या मोबाईलवर त्यांच्या बॅंक खात्यातून प्रत्येकी ५० हजार काढून घेतल्याचे तीन संदेश आले. सायबर भामटयाने एकूण तीन वेळा त्यांच्या खात्यातून दिड लाख रूपये काढून घेतले होते. ही सायबर फसवणूक असल्याचे फिर्यादी यांच्या लक्षात आले. अज्ञात इसमाने त्यांना एक एपीके फाईल डाऊनलोड करण्यास सांगून त्यांचा मोबाईल हॅक केला होता आणि बॅंकेचे तपशील मिळवून बॅंकेतील रक्कम काढून घेतली. तक्रारदार यांनी तात्काळ सायबर पोलिसांच्या १९३० या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क केला. याप्रकरणी पवई पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलम ६६ (सी) ६६ (डी) तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८ (४), ३१९ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अधिकृत संकेतस्थळावरूनच माहिती घ्यावी

अनेक जण इंटरनेटवर ऑनलाईन वेगवेगळ्या प्रकारची माहिती शोधत असतात. त्याचा फायदा सायबर भामटे घेतात. ते नामांकित कंपन्यांच्या नावाने बनावट पेज तयार करतात. अनेक जण मोबाईल क्रमांक देखील गुगलवर शोधतात. त्यांना मग बनावट संकेतस्थळावरील संपर्क क्रमांक मिळतात. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारे त्यांची फसवणूक केली जाते. त्यामुळे कुठलाही माहिती हवी असल्यास संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाची खात्री करूनच पुढील व्यवहार करावेत, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे. अनोळखी व्यक्तीने पाठवलेली संशयास्पद फाईल डाऊनलोड करू नये, लिंक उघडू नये असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.