डेंग्यूमुळे केईएम रुग्णालयातील डॉक्टरचा झालेला मृत्यू, डेंग्यू रुग्णांची वाढती संख्या, अस्वच्छता, डासांची मोठय़ा प्रमाणावर होऊ लागलेली उत्पत्ती आणि साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या तुटपुंजा उपाययोजना आदी प्रश्नांवरून मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षांनी सत्ताधारी शिवसेना-भाजप आणि अपयशी प्रशासनाच्या विरोधात मोर्चेबांधणी केली आहे. स्थायी समितीच्या आज, गुरुवारी होणाऱ्या बैठकीत डेंग्यूवरून सत्ताधारी व प्रशासनावर तोफ डागण्याचा विरोधकांचा इरादा आहे.
मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. कर्मचारी निवडणुकीच्या कामाला गेल्यामुळे धूम्रफवारणी, कीटकनाशक फवारणी मंदावल्याने मोठय़ा प्रमाणावर डासांची उत्पत्ती झाली आहे. परिणामी मुंबईतील अनेक भागात डेंग्यूचे रुग्ण आढळू लागले आहे. केईएम रुग्णालयाच्या परिसरात डासांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे प्रशासनाने रुग्णालयावर नोटीस बजावली आहे. त्यातच केईएम रुग्णालयातील डॉक्टरचे डेंग्यूमुळे निधन झाल्यामुळे प्रशासन अडचणीत आले आहे. सत्ताधारी शिवसेना-भाजपचा प्रशासनावर अंकुश नसल्यामुळे डेंग्यू मुंबईकरांच्या जीवावर बेतला आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी केला आहे.डेंग्यूच्या बळींची संख्या वाढत असताना झेपेचे सोंग घेतलेले सत्ताधारी आणि प्रशासनाला जागे करण्यासाठी स्थायी समितीच्या गुरुवारच्या बैठकीत या प्रश्नाला वाचा फोडण्यात येणार आहे. प्रशासनाने डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दोन दिवसांमध्ये युद्धपातळीवर ठोस उपाययोजना केली नाही, तर सभागृहाचेही कामकाज होऊ देणार नाही, असा इशारा देवेंद्र आंबेरकर यांनी दिला आहे.
पुढील आठवडय़ापर्यंत प्रतीक्षा
विधानसभा निवडणुकीच्या काळात आचारसंहिता जारी असल्यामुळे पालिकेच्या कामांच्या अनेक प्रस्तावांना मंजुरी मिळू शकलेली नाही. आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर स्थायी समितीची गुरुवारी पहिलीच बैठक होत आहे. या बैठकीत महत्त्वाच्या कामांचे प्रस्ताव प्रशासनाकडून सादर होण्याची शक्यता आहे. मात्र डेंग्यूच्या मुद्दय़ावरून प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणण्याचा निर्णय विरोधकांनी घेतला आहे. त्यामुळे या प्रस्तावांना पुढील आठवडय़ापर्यंत मंजुरीची प्रतीक्षा करावी लागण्याची चिन्हे आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 30th Oct 2014 रोजी प्रकाशित
डेंग्यूवरून विरोधक एकवटले
डेंग्यूमुळे केईएम रुग्णालयातील डॉक्टरचा झालेला मृत्यू, डेंग्यू रुग्णांची वाढती संख्या, अस्वच्छता, डासांची मोठय़ा प्रमाणावर होऊ लागलेली उत्पत्ती आणि साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या तुटपुंजा उपाययोजना आदी प्रश्नांवरून मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षांनी सत्ताधारी शिवसेना-भाजप आणि अपयशी प्रशासनाच्या विरोधात मोर्चेबांधणी केली आहे.

First published on: 30-10-2014 at 04:32 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Opponents gather against dengue in bmc