मुंबई:  विविध पक्षांचे आमदार पळवणे, लोकशाहीच्या प्रथा परंपरा मोडून काढणे आणि आमदारांना सांभाळण्यात राज्यकर्ते  मश्गूल आहेत. पण त्याच वेळी  पावसाने ओढ दिल्याने राज्यावर दुबार पेरणीचे संकट आहे. राज्यातील जनतेच्या जिव्हाळय़ाच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला या सरकारला वेळ नाही, असा आरोप विरोधकांनी रविवारी केला.

राज्यातील विरोधक एकसंध असून पावसाळी  अधिवेशनात या सरकारविरोधात लढण्याचा निर्धार विरोधी पक्षाने केला आहे. हे कलंकित सरकार असून त्याच्या निषेधार्थ सरकारच्या चहापानावर बहिष्कार घालण्यात आला.  विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर  विरोधी पक्षांच्या नेत्यांची  विधान भवनात बैठक झाली.  आमची संख्या कमी असली तरी सरकारला सळो की पळो करून सोडू, असा इशारा विरोधकांनी दिला.

ज्यांना सर्वोच्च न्यायालयाने गटनेता म्हणूनही नाकारले तेच आज राज्याचे मुख्यमंत्री आहेत. मंत्री आणि आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार कायम आहे. हे सरकार घटनाबाह्य आणि कलंकित आहे. शेतकरी, महिला, युवाविरोधी सरकारने राज्याला मागे नेण्याचे काम केले आहे, असा आरोप  विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.

 फोडाफोडीच्या राजकारणात विकास मागे पडतो आहे, अशी  टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे  नेते एकनाथ खडसे यांनी यावेळी केली. यावेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, भाई जगताप, अभिजित वंजारी,   सुनील प्रभू आदी उपस्थित होते.

निव्वळ घोषणा -थोरात  राज्यात पावसाने ओढ दिल्याने दुबार पेरणीही होऊ शकत नाही. धरणांमधील पाणीसाठा २७ टक्क्यांवर आला आहे. कापूस, सोयाबीनला भाव मिळत नाही.  शेतकऱ्यांना  जाहीर झालेली मदत मिळालेली नाही. कर्जमाफीच्या केवळ घोषणा झाल्या आहेत. शेतकरी हवालदिल झालेला आहे. राजकारणासाठी जातीय दंगली घडविल्या जात आहेत. सहा महिन्यात पाच हजारांहून अधिक महिला बेपत्ता झाल्या आहेत. दुसरीकडे सरकार मात्र खातेवाटप, विस्तार आणि आमदारांना सांभाळण्यात मश्गूल असल्याचा टोला काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी लगावला.